Rupali Chakankar in Sangli: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar in Sangli) आज सांगली (Sangli News) दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्याना कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा निवेदन देखील देऊ नये याबाबतची समज देण्यात आली आहे. 


महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना अडवून ठेवले


तसेच सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीची आज मासिक बैठक होत आहे. दुसरीकडे, रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून विविध मागण्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी  राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना सकाळपासून अडवून ठेवण्यात आले होते. 


यानंतर रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन अथवा निवेदन न देण्याच्या अटीवर त्याना सोडून देण्यात आले आहे, तशा पद्धतीचे लेखी पत्र देखील राष्ट्रवादी महिला आघाडीकडून घेण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सुस्मिता जाधव यांनी केला आहे.


व्हायरल फोटोवर रुपाली चाकणकर म्हणाल्या...


दरम्यान, काल (6 जुलै) रुपाली चाकणकर कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. गेल्या काही  दिवसांपासून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यानंतर आता अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने आता चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोवरून रुपाली चाकणकर यांनी कोल्हापुरात बोलताना खुलासा केला. 


त्या म्हणाल्या की, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत काम करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही आमच्या विचारधारेबरोबर काम करतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो दहा वर्षांपूर्वींचा आहे. तो फोटो व्हायरल करून एखाद्याचं घर चालत असेल तर नाईलाज आहे. नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमची विधारधारा घेऊनच काम करतो. त्यांच्या झेंड्याखाली आम्ही काम करत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या