Sangli Crime: सांगलीमधील मिरज शहर परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींकडून मिरज शहरातील 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. महंमद कैस फैयाज मुल्ला (वय 20, रा. गुरुवार पेठ), लुमान अजीज गद्यालपटेल (वय 22, रा. किल्ला भाग), शाहिद मुनीर गोदड (वय 22, रा. टाकळी रोड), फैयाज सिकंदर गोदड (वय 19, रा. टाकळी रोड), अरबाज फैयाज वांगरे (वय 22, रा. किल्ला भाग, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 


सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीतील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक पथक तयार केले होते. काही दिवसांपूर्वी बोलवाड रोड परिसरातील एका घरात चोर घुसल्याची माहिती नागरिकांनी निरीक्षक झाडे यांना दिली. त्यांनी पथकाला घटनास्थळी पाठवले. त्यावेळी यातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी काही साथीदारांची नावे दिली. त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी मिरज शहरातील 6 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोकड, संगणक आणि त्याचे साहित्य, मॉनिटर, मोबाईल असा 6 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


व्यापाऱ्याला 25 लाखांना गंडा, टोळीतील दोन महिलांसह चौघे अटकेत


दुसरीकडे, स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलांसह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावर आणेवाडी नाक्यावर अटक करण्यात आली आहे. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडून लुटीतील साडे बारा लाख हस्तगत करण्यात आले आहेत. पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना संबंधित टोळीने स्वस्तात सोने देण्याचं आश्वासन दिलं होतं. स्वस्तात सोन मिळेल या अपेक्षेने मयूर जैन सांगलीत आले. टोळीने त्यांना मंगळवारी (20 जून) सांगलीतील फळमार्केट जवळ बोलावले. त्यानुसार मयूर जैन तिथे पोहोचले. अशोक रेड्डी याच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या टोळीने सोन्याचे बिस्किट दाखवून जैन यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले, मात्र सोने न देता पोलीस आल्याचे सांगत तिथून पोबारा केला. 


इतर महत्वाच्या बातम्या