Kolhapur Weather update: किरकोळ शिडकावा अपवाद वगळता कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णतः दडी मारली आहे. त्यामुळे केलेल्या पेरण्या तसेच उभी पिके संकटात आली आहेत. त्यामुळे बळीराजाकडून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रामध्ये पाऊस होईल अशी शक्यता धरून बळीराजा पेरणी केली होती. मात्र, मृग नक्षत्रात एक थेंबही कोसळत नसल्याने केलेल्या पेरण्या संकटात आल्या आहेत. त्याचबरोबर खरीप हंगाम सुद्धा आता संकटात येतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


कोल्हापूर आणि सातारमध्ये 25 आणि 26 जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज 


या सर्व पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभाग मुंबईकडून दिलेल्या अंदाजानुसार कोल्हापूरसह, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तथापि, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अजूनही पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, कोल्हापूर आणि सातारमध्ये मात्र पुढील तीन दिवसानंतर दोन दिवस जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. 25 आणि 26 जून रोजी कोल्हापूर आणि सातारामध्ये घाटमाथा परिसरासह जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास पुन्हा एकदा खरिपाचा हंगामास वेग येण्याची शक्यता आहे. 


जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी शेतीची मशागत करून ठेवली आहे. मात्र, पाऊसच नसल्याने शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा नसल्याने सोयाबीनची पेरणी केलेली नाही. तसेच भुईमुगाची पेरणी केली नाही. जिल्ह्यातील जवळपास 90 टक्के पेरण्या प्रलंबित आहेत. जोवर दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून तसेच कृषी विभागाकडून जिल्ह्यातील बळीराजाला करण्यात आलं आहे. 


जोपर्यंत सलग तीन दिवस पाऊस जिल्ह्यामध्ये होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची पेरणी करण्यासाठी घाई करू नका, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन दिवसांपूर्वी केलं आहे. त्यामुळे एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामधील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याचा प्रश्नही गंभीर रूप धारण करत चालला आहे. जिल्ह्यासाठी प्रमुख असलेल्या आठ धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला गेला आहे. 


याचा थेट परिणाम शेतीमधील पिकावर झाला असून शेतीसाठी उपसा जवळपास बंद करण्यात आला आहे. इथून पुढे पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाईल, तर दुसरीकडे शेतीसाठी उपसा होत नसल्याने प्रामुख्याने ऊस पीक संकटात आलं आहे. राधानगरी धरणाने तळ गाठला आहे, काळम्मावाडी धरण पूर्ण कोरडं पडलं आहे. इतिहासात प्रथमच धरण कोरडं पडलं आहे.  कोल्हापूर शहरामध्येही पाणी स्थिती गंभीर होत चालली आहे. शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या