Chhatrapati Shivaray throne statue in Ashta : सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरु झालेल्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आष्ट्यामध्ये 'तो' पुतळा बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सांगली जिल्हा प्रशासनाकडून आष्टा विकास आराखड्यानुसार बगीचा विकास करण्यास मंजुरी देत जिल्हाधिकाऱ्यांनी ती जागा हस्तांतरित केल्याचं पत्र पालिकेला दिलं आहे. आष्टा नगरपालिकेचा बगिचा व पुतळ्यासाठी यापूर्वीच ठराव झाला होता. यावर आता काल पुतळा बसवलेल्या भाजप आणि शिवप्रेमी गटाने पेढे वाटत जल्लोष केला. दुसरीकडे आष्टा शहरात पुतळ्यासाठी स्थापन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीने देखील आनंद व्यक्त करत जल्लोष करत आता लवकरच थाटामाटात पुतळा बसवू असे म्हटलं आहे. 


महाराजांचा पुतळा बसवण्याची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. गेल्या काही दिवसांपासून जोर वाढल्याने 8 दिवसात गनिमी काव्याने महाराजांचा पुतळा दोनवेळा बसवण्यात आला होता. त्यामुळे आष्टा शहरात 2 दिवसात पुतळा उभारण्यावरून वातवरण गरम झाले होते.  इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आष्टामध्ये येऊन पुतळा उभारलेल्या भाजप कार्यकर्त्यांना आणि शिवप्रेमींना ताकद देत पुतळा उभारलेल्या ठिकाणी महाआरतीचे काल सायंकाळी आयोजन केले होते. 


मात्र, पोलिसांनी महाआरतीसाठी उभारलेला मांडव हटवत पुतळा परिसरास कलम 144 लागू केले. त्यांनतर निशिकांत पाटील शिवप्रेमींसोबत पुतळ्याजवळ ठिय्या मारून बसले. प्रशासनासोबत झालेली चर्चा फिस्कटली आणि शिवप्रेमी आणि निशिकांत पाटील आक्रमक होत सांगलीकडे जाणाऱ्या हायवेवर ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले आणि मध्यरात्री पुतळा काढायला सुरुवात केली.


या दडपशाहीच्या निषेधार्थ भाजप आणि शिवप्रेमींकडून इस्लामपूरसह वाळवा तालुका बंदची हाक दिली गेली. पुतळा हटवलेल्या ठिकाणी त्यामुळे बंदोबस्त तसाच होता. शिवाय आष्टा शहरात तणावपूर्ण शांतता होती. प्रशासनाने देखील तणावपूर्ण परिस्थिती पाहून अखेर आष्टा नगरपालिकेला पुतळ्याच्या ठिकाणची जागा  हस्तारणबाबत मंजुरीचे पत्रदिले. यामध्ये या भागाचे खासदार धैर्यशील माने यांनी देखील मध्यस्थी करत हा पुतळ्यावरून वाद मिटवण्यात मध्यस्थी केली. 


बऱ्याच वर्षांपासून पुतळा उभा करण्याची मागणी असूनही प्रशासन हालचाल करत नसल्याने गनिमी काव्याने पुतळा बसवल्यावर हालचाली झाल्या. त्यामुळे महापुरुषांचे पुतळ्ंयाना परवानगी आणि ते पुतळे बसवण्यासाठी ठोस धोरण  ठरवण्याची गरज आहे.


इतर महत्वाच्या बातम्या