सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) साखर कारखानदारांना 100 रुपये देण्याासाठी भाग पाडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी (Raju Shetti) आता सांगलीकडे मोर्चा वळवला आहे. सांगलीमध्ये आंदोलनाची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली होती. त्या टीकेलाही राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कुण्या लुंग्या सुंग्याच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते आजही आंदोलनाला बसतात हे माझे प्रमाणपत्र, असं म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावला.
सदाभाऊ खोतांच्या टीकेवर राजू शेट्टींचा पलटवार
राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून माझ्यावर असे आरोप होत आहेत. मला कोण्या लुंग्या-सुंग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. एका हकेवर हजारो शेतकरी जमत असतील आणि साथ देत असतील तर हेच माझ्यासाठी सर्टिफिकेट आहे. कारखानदारांशी संगनमत करून स्वतःच्या अंगाला गुलाल लावून घेतल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.
कोल्हापूरमध्ये ठरलेल्या मसुद्याची सांगलीत अंमलबजावणी करावी
राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूरमध्ये ठरलेल्या मसुद्याची सांगली जिल्ह्यातील कारखानादारानी अंमलबजावणी करावी. सांगली जिल्ह्यातील ऊस कारखानादारानी कोल्हापूरमधील कारखानदारांचा फॉर्म्युला स्वीकारावा आणि ऊस दर जाहीर करावा, असा इशारा राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानादारांना दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ऊस दराबाबत 26 नोव्हेंबर रोजी साखर कारखानादार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक होणार आहे.
शेट्टी यांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी ऊस दराचा निर्णय न झाल्यास सांगली जिल्ह्यात एकही वाहन फिरू देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी घेणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही साखर कारखान्यांना आता सुट्टी नाही. कोल्हापूरप्रमाणे निर्णय घ्यावा अन्यथा आता कोल्हापूरचे शेतकरी सांगलीच्या शेतकऱ्यांच्या मदतीला येतील.
पालकमंत्री सुरेश खाडेंवर केली टीका
जिल्ह्यातील ऊस दरावरून सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर शेट्टी यांनी टीका केली. ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी एवढ्या दिवसात काय केलं ? पालकमंत्री कश्यासाठी असतो? पोरं एकमेकांच्या उरावर बसून झिंज्या उपटत आहेत. पालकमंत्री काहीच करत नाही ? पालकमंत्र्यांचे काही काम नाही का? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या