कोल्हापूर : तुटलेल्या ऊसाला 400 रुपयांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध पातळीवर आंदोलन करूनही कोणतीच दखल सरकार आणि साखरसम्राटांकडून घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांसह कोल्हापुरात नॅशनल हायवेवर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे.


आज (23 नोव्हेंबर) राजू शेट्टी यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून चक्काजाम आंदोलन सुरु केल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी (Shahu Maharaj support to Raju Shetti) आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी हायवेवर जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच त्यांनी या आंदोलनावर आजच तोडगा काढण्याची विनंती शासन आणि संबंधितांना केली.यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना महाराज म्हणाले की, इतर सगळ्यांच्या तुलनेत ऊसाचा दर वाढलेला नाही. गेल्या 10 ते 15 वर्षात त्यांच्यामुळे दर मिळत आहे. आजपर्यंतचा दर राजू शेट्टींमुळे मिळाला आहे. संबंधितांनी लवकर लवकर दखल घेऊन निकाल लावला पाहिजे. 


चार कारखान्यांकडून 100 रुपये देण्याची तयारी 


दरम्यान, शाहू महाराज यांनी भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आतापर्यंत चार कारखान्यांनी 100 रुपये देण्याची तयारी दाखवल्याचे सांगितले. तसेच बाकी कारखान्यांचं काय करायचं ते पाहू असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


साखर कारखान्यांनी दराची पहिली पुडी सोडली


दुसरीकडे ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीची अट घालू नका, अशी अट घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार 100 रुपये देण्यास तयार झाले आहेत. मात्र, हायवेवर मुक्काम ठोकलेल्या राजू शेट्टी यांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे. गेल्यावर्षीचे म्हणून 100 रुपये द्या, या भूमिकेवर राजू शेट्टी ठाम आहेत. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत महामार्ग सोडणार नसल्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे. 


दरम्यान, कोल्हापूर पोलिसांकडून आंदोलनलस्थळी तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून तळंदगे फाटा-हातकणंगले-जयसिंगपूर-इस्लामपूर-पेठ नाका येथून पुण्याकडे जाण्यास वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापुरातून बेळगावकडे जाण्यासाठी कसबा बावडा-कोल्हापूर शहर शिवाजी विद्यापीठ मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.


गतवर्षीच्या उसाला प्रतिटन शंभर रुपये साखर कारखान्यांनी आणि तीनशे रुपये सरकारने द्यावेत, कारखान्यांनी शंभर रुपयांपेक्षा जादा रकमेचा दुसरा हप्ता द्यावा आणि खुशाल साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन शेट्टी यांनी केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या