सांगली : सांगलीच्या (Sangli News) जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी (Water Crisis) आता पुन्हा कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. यासाठी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. जवळपास 50 हून अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केले आहे. जर महाराष्ट्र सरकार जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करत नसेल आणि आम्हाला म्हैसाळ योजनेतून पाणी मिळणाराच नसेल तर मग आम्हाला कर्नाटकात जाण्यास आता महाराष्ट्र सरकारनेच परवानगी द्यावी अशी आक्रमक भूमिका आता या भागातील दुष्काळग्रस्त नागरीक करत आहेत.


 सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. यंदा जुलै महिना संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही.  त्यामुळे यावर्षी तालुक्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या जवळपास  वाया गेल्या आहेत.तर  पाण्याची टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. मात्र प्रशासनाकडून राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत  जत तालुक्यातल्या 65 गावांनी दुष्काळी तालुक्याच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.


राज्य सरकारकडून चाल-ढकल


राज्य सरकारकडून जर पाणी देता येत नसेल,दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर आता आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यासाठी परवानगी द्यावी  अशी पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांनी मागणी केली आहे.कर्नाटक सरकारकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकतं, मात्र या बाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे. याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे. 


पिकांची पेरणी देखील अद्याप झालेली नाही


सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच जत,आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात प्रामुख्याने कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिकं घेतली जातात.परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नाही. त्यामुळे या पिकांची पेरणी देखील अद्याप झालेली नाही. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने  खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची उगवण खुंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र सध्या सांगली जिल्ह्यात आहे. दुसरीकडे कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज या पूर्वेकडील तालुक्यात देखील भीषण परिस्थिती काही दिवसात निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यापासून सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही सूचना पालकमंत्री सुरेश खाडे  जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार जत तालुक्यातील सध्याच्या घडीला 12 ते 15 गावामधून टँकरची मागणी होत आहे. तसेच सीमेवरील आठ गावातील वाड्या वस्त्यांमध्ये   टँकर सुरू करण्यात आले आहे