Almatti Dam : कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता अलमट्टी धरणातून तत्काळ एक लाख क्युसेक्स विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी पाहता 2019 ची महापुराची परिस्थिती टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी कृती समितीने केली आहे. याबाबत समितीने आज मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई मेल पाठविला आहे. 


पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, सोमवारी 24 जुलै रोजी कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळी 514.94 मीटर आहे. धरणातील पाण्याची आवक 1 लाख 14 हजार 445 क्युसेक इतका आहे. धरणातून केवळ 6253 क्युसेकने पाणी विसर्ग केले जात आहे. त्याचवेळी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अलमट्टी धरणाच्या पाणलोट आणि इतर मुक्त पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदी काठावरील जनता भयभीत झाली आहे.


केंद्रीय जल आयोगाचे नोव्हेंबर 2018 ची मार्गदर्शक पुस्तिका अलमट्टी धरण देखभाल आणि परिचलन अन्वये 31 जुलै अखेर अलमट्टी धरणातून 513.60 मीटर पाणी पातळी ठेऊन, वरून येणारा विसर्ग तसाच सोडला तर पंचगंगा नदी पात्रातील पाणी पातळी कमी होईल व नागरिकांचे भय कमी होईल. म्हणून अलमट्टी धरणातून 1 लाख क्युसेकने विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला आपल्या मार्फत तत्काळ सूचना देण्यात याव्यात अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे संघटक जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय कुमार दिवाण, प्रभाकर केंगार आणि निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीने आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास इशारा पातळी गाठली. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर आज (24 जुलै) दुपारी तीन वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 11 इंच इतकी झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास आजच नदी धोका पातळी सुद्धा गाठण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या