Sindhudurg News Update : कराडमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या मारहाणीत मित्राचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आलेल्या दोघांपैकी एकाचा आंबोली घाटात  ( Amboli Ghat) दरीत कोसळून मृत्यू झाला. आंबोली घाटातील दरीत मृतदेह फेकत असताना फेकणाराही मृतदेहासोबत दरीत कोसळल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. या आणि अशा अनेक घटनांमुळे आंबोली घाट आता मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनत चाललं आहे की काय असं चित्र निर्माण झालंय. याआधी सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळे याचा मृतदेह आंबोली मधील महादेवगड पॉईंटवर जाळून फेकून दिला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव मधील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोली मधील कावळेसाद पॉईंटच्या दरीत फेकण्यात आला होता. आता पुन्हा एकदा सुशांत खिल्लारे याचा घातपात करून आंबोलीच्या मुख्य धबधब्यापासून जवळ घाटातील दरीत त्याचा मृतदेह फेकत असताना घात करणारा अरूण माने याचा देखील मृत्यू झाला. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागलीय. आंबोली पोलिसांच्या तपासणी नाक्यावरून साताऱ्यातून मृतदेह घेऊन येणारी गाडी जाते. मात्र पोलिसांना याबाबत कोणताही सुगावा लागत नाही. महत्वाची बाब म्हणजे पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरून मृतदेह दरीत फेकले जात आहेत. तरी देखील पोलिसांना याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे सामान्य जनतेतून आता विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. 


पर्यटांचे आकर्षण असलेला आंबोली घाट आता मृतदेह फेकण्याचं ठिकाण बनू लागल्याने पर्यटकांमधून चिंतेचा सूर उमटत आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलिस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 


कराड येथील वीट भट्टी व्यावसायिक आणि कामगार पुरवणाऱ्या दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवघवीवरून झालेल्या वादानंतर हाणामारीत सुशांत खिल्लारे या युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर अरूण माने आणि तुषार पवार यांनी सुशांत याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटाची निवड केली. हे दोघे मृतदेह कारमध्ये घेऊन कराड वरून आंबोली घाटात पोहोचले. आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या अंधारात मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर संरक्षक कठड्यावर उभे राहिले. यावेळी सुशांतचा मृतदेह  खोल दरीत फेकला गेला. परंतु, तोल गेल्याने अरूण माने देखील खोल दरीमध्ये कोसळला. तुषार मात्र यातून बचावला. या घटनेनंतर तुषार याने मित्र माने याला हाका मारल्या. परंतु, सुशांत यांचा मृत्यू झाला. 


असा उघड झाला बनाव


या घटनेनंतर आंबोली घाटातील खोल दरीत कोसळून युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरीत कोसळलेल्या युवकाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना दोन मृतदेह सापडले. त्यामुळे दुसरा मृतदेह कुणाचा याचा पोलिस शोध घेत असतानाच त्यांना मृत युवकाच्या मित्रावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी एकाची हत्या करून तो मृतदेह दरीत टाकण्यासाठी आलो असताना माझ्यासोबतच्या मित्राचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि त्याचा देखील मृत्यू झाला अशी माहिती मृत युवकाच्या मित्राने पोलिसांनी दिली. त्यामुळे दरीतील दोन मृतदेहांचं गूढ अखरे उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.   


महत्वाच्या बातम्या


आंबोली घाटात खोल दरीत युवक कोसळल्याचा बनाव उघड, मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपीचा मृत्यू