Sangli: राज्यात महाविकास आघाडी गुण्यागोविंदानं नांदत असताना सांगलीच्या इस्लामपूरमध्ये मात्र काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीवरून (Congress Office Dispute) काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) वाद जुंपलाय. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर इस्लामपूरच्या काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीचा (Islampur Congress Office) ताबा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. कार्यालय काँग्रेसच्या नावावर असून, ताबा मात्र गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादीचा आहे. त्यानंतर आता, कार्यालय ताब्यात घेण्याचे आदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, त्यामुळे या कार्यालयाच्या ताब्यावरून इस्लामपूरमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
नाना पटोलेंनी घेतलेल्या मेळाव्यात निघाला मुद्दा
मागील आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत इस्लामपूरमध्ये काँग्रेसचा एक मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कॉंग्रेसच्या कार्यालयाचा मुद्दा ऐरणीवर आला. तहसीलदार कार्यालयाजवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाचा ताबा सध्या राष्ट्रवादीकडे आहे.
24 वर्षांपासून काँग्रेस कार्यालय राष्ट्रवादीच्या ताब्यात
काँग्रेसमधून फुटून 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यावेळी आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्ष कार्यालयातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सुरू आहे. तब्बल 24 वर्षे तालुका काँग्रेस कमिटीच्या जागेवर ताबा घेवून राष्ट्रवादी कार्यालय वापरत आहे.
नैतिकता असेल तर कार्यालयाची इमारत तात्काळ सोडावी, काँग्रेसचं आवाहन
राष्ट्रवादीकडे नैतिकता असेल तर त्यांनी काँग्रेस कमिटीच्या इमारतीची जागा तात्काळ सोडावी आणि वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कॉंग्रेसच्या दाव्यानुसार,
- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष यु. एन. देवर यांनी 25 मे 1955 साली प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर काँग्रेस कमिटी करण्याची सूचना दिली होती.
- त्यानुसार सांगली आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेस कमिटीसाठी जागेची मागणी करत पत्र दिले होते.
- राष्ट्रीय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांनी पत्रव्यवहार करून सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव आणि इस्लामपूर या तीन ठिकाणी काँग्रेस कमिटीसाठी मंजुरी घेतली होती.
- यातील इस्लामपूरमधील जागेवर 26 ऑगस्ट 1961 रोजी 'प्रेसिडेंट तालुका काँग्रेस कमिटी, वाळवा'ची नोंद झाली होती आणि ती आजही कायम असल्याचे काँग्रेसचे पदाधिकारी सांगतात.
- जयंत पाटील यांनी 1985 साली कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता, कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर 1999 पर्यंत त्यांनी तालुक्यातील सर्व निवडणुका आणि विधानसभा निवडणुका कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवल्या. मात्र, शरद पवार यांनी 1999 साली काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तेव्हापासून आजपर्यंत कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू आहे.
- विटा आणि तासगाव येथील काँग्रेस कमिटी मात्र काँग्रेसच्याच ताब्यात आहे. इस्लामपुरातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली काँग्रेस कमिटी कॉंग्रेसच्या ताब्यात मिळावी, अशी मागणी आता काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.
मोठेपणा दाखवून राष्ट्रवादीने काँग्रेस कार्यालयाची जागा सोडावी
राज्यात महाविकास आघाडी एकत्र नांदत आहे, त्यामुळे काँग्रेस कमिटीवर राष्ट्रवादीने घेतलेला ताबा राष्ट्रवादी सोडेल, त्यासाठी फार संघर्ष करावा लागणार नाही, असा विश्वास कॉंग्रेस पदाधिकारी विजय पवार यांनी व्यक्त केला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी कार्यालयासाठी कुठेही जागा घेवू शकतात, त्यामुळे त्यांनी मोठेपणा दाखवून कॉंग्रेस कार्यालयाची जागा सोडावी, अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया नाही, जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
आता राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर काँग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीचा ताबा घेतलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे या कार्यालयाबाबत जयंत पाटील (Jayant Patil) हेच बोलतील, अशी आशा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.
इस्लामपूरमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटणार?
मुळात नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या इस्लामपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेत इस्लामपूर भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. दुसरीकडे, याच मेळाव्यात 24 वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले कार्यालय परत कॉंग्रेसला मिळावे, अशी मागणी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे कॉंग्रेसचा इस्लामपूरमधील मेळावा हा नाना पटोलेंनी जयंत पाटील यांना शह देण्यासाठी घेतला होता, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा: