Sangli News: देशभरातील विरोधी पक्षांमधील नेत्यांविरोधात ईडी सीबीआयचा वापर होत असल्याने मोदी सरकारवरील सातत्याने होणारी टीका नवीन नाही. मात्र, आता सांगली जिल्ह्यातील जतमधील एका बॅनरने चागंलेच लक्ष वेधले आहे. भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा व एक लाख रूपयाचे बक्षीस मिळवा. अशा आशयाचा हा बॅनर आहे. जत तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हा बॅनर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर खळबड उडाली आहे. या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आल्याची चर्चा आहे.
जयंत पाटील यांना ईडीने नोटीस दिल्याने जत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेधार्थ जतच्या एसटी स्टँडवर बॅनर लावला आहे. भाजपच्या नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा, अशा आशयाचा बॅनर आहे. जयंत पाटील यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसचा जाहीर निषेध हा बॅनर लावला आहे. त्यामुळे जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रात या डिजिटल बोर्डची चर्चा चांगलीच रंगली आहे.
चौकशीसाठी मुदत वाढवून मिळण्यासाठी जयंत पाटलांचं ईडीला पत्र
दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी नोटीस (ED Notice) पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी आज सोमवारी (15 मे) हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले होते. मात्र, जवळच्या नातेवाईकांचे लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत वाढवून घेतली आहे.
पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र, या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या 'आयएल अँड एफएस' कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या