Sangli Mass Murder : म्हैसाळमधील गुप्तधनाच्या अमिषातून मांत्रिकाच्या जाळ्यात अडकलेल्या वनमोरे कुटुंबातील 9 जणांच्या हत्याकांड प्रकरणातील अटक केलेल्या मांत्रिकांना जादूटोणाविरोधी कायदा लावावा अशी मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’ तर्फे करण्यात आली आहे.
गुप्तधन, पैशांचा पाऊस अशी आमिषे दाखवून लोकांना भुलवणाऱ्या आणि लुबाडणार्या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशीही अंनिसकडून मागणी करण्यात आली. राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली. यावेळी ‘अंनिस’चे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल थोरात प. रा. आर्डे, चंद्रकांत वंजाळे, आशा धनाले, त्रिशला शहा , हनुमंत सुर्यवंशी उपस्थित होते.
जादूटोणाविरोधी कायदा लावावा
गेली अनेक महिने डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे बंधू हे मुख्य संशयित मांत्रिक बागवान आणि सहकारी धीरज सुरवसे यांच्या संपर्कात होते, हे आता स्पष्ट झाले आहे. मांत्रिकांनी वनमोरे बंधूंना गुप्तधन शोधण्यासाठी मदत करण्याचे कारण दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे देखील समोर आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दैवी शक्तीचा दावा करून लोकांना फसवणे आणि ठकवणे हा गुन्हा असल्याने तातडीने या प्रकरणी जादूटोणाविरोधी कायदा लावावा, अशी मागणी अंनिसने केली.
दरम्यान, सांगलीमध्ये पैशांचा पाऊस पडण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची देखील एक घटना नुकतीच पुढे आली आहे. या दोन्ही घटना लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील दक्षता अधिकार्यांची प्रशिक्षण कार्यशाळा ही तातडीने आयोजित करून ती यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी देखील यावेळी अंनिसकडून करण्यात आली.
भूलथापांना लोकांनी बळी पडू नये
सधन कुटुंबातील व्यक्ती देखील पैशांच्या हव्यासातून नोटा दामदुप्पट करणे, उल्कापातातून झालेल्या धातूचे यंत्र ‘नासा’ला विकून मालामाल होणे, पैशांचा पाऊस, गुप्तधन अशा हव्यासाला बळी पडताना दिसत आहेत. अशा प्रकारे कोणाचेही पैसे दामदुप्पट होऊ शकत नाहीत. अशा भूलथापांना लोकांनी बळी पडू नये. अशा स्वरुपाच्या गुप्तधनाच्या दाव्यावर विश्वास ठेवणे आणि सातत्याने त्याच्या मागे धावणे, या पाठीमागे मानसिक अस्वस्थतेची लक्षणे असू शकतात. त्यामुळे गरज पडल्यास अशा व्यक्तीला बरे करण्यासाठी कुटुंबीयांनी मानसोपचारांची मदत घ्यावी, असे देखील डॉ. हमीद दाभोलकर यांनी आवाहन केलं आहे.
‘अंनिस’च्या मागण्या
- सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पैशांचा पाऊस पाडणार्या, गुप्तधन शोधून देणार्या, बायंगी भूत विकणार्या अशा मांत्रिकांच्या टोळ्या कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या टोळ्या अत्यंत हुशारीने, चलाखीने आणि संघटितपणे गुन्हे करतात, लोकांना फसवतात.
- दुर्मिळ वस्तू ‘नासा’ला विकल्यानंतर करोडो रुपये मिळवून देऊ, असा खोटा प्रचार करणार्या परराज्यांतील काही बोगस कंपन्यांकडून जिल्ह्यातील लोक फसले जात आहेत. याचा सायबर पोलिसांनी तपास करुन ही फसवणूक थांबवावी.
- म्हैसाळ प्रकरणात गेल्या 5 वर्षांपासून वनमोरे बंधूची जे-जे मांत्रिक, बोगस कंपन्या आर्थिक फसवणूक करत होत्या, त्या सर्वांची कसून चौकशी करावी, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.
- गुप्तधन धनाचे आमिष दाखवून आर्थिक, मानसिक फसवणूक करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. तो गुन्हा म्हैसाळ प्रकरणात लावावा.
- जिल्हा प्रशासनाने समाजातील अंधश्रद्धा, अघोरी प्रथा या विरोधात प्रबोधन मोहीम राबविण्यासाठी ‘अंनिस’ला सहकार्य करावे.
- यामध्ये नागरिक, महिला, विद्यार्थी, शिक्षक, पोलीस पाटील, जादूटोणाविरोधी कायद्याचे पोलीस स्टेशनचे दक्षता अधिकारी यांचे प्रशिक्षण घ्यावे.