Sangli News Updates : सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत आणि पळण्याची लगबग पसरली आहे. त्याचं कारण आहे भुताची आई असलेली तडकडताई. ज्येष्ठ महिन्यात आषाडीच्या अमावास्येला दैत्याचा संहार करण्यासाठी महिशासूर मर्दिनी 'तडकडताई' वेश घेऊन शहराची रखवाली करण्यासाठी फिरत असते. अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही 'तडकडताई'  म्हणजे सांगलीची जुनी परंपरा.


ज्येष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात होते. 'तडकडताई, भुताची आई' असा गजर करत लहान मुले या 'तडकडताई'चे स्वागत करतात. कुंभार घराण्याकडे 'तडकडताई' चा हा मान असतो. ही परंपरा गेल्या 250 वर्षापासून सांगलीत सुरू आहे. कर्नाटक मधील बदामी येथून 7 वाट्या मानव लोकांनी पळवून आणल्या होत्या. त्यातली वाटी एक सांगली, आष्टा, कासेगाव, पलूस, कवठे पिरान अश्या ठिकाणी आल्या आहेत. त्यावेळी पासून ही प्रथा सुरू आहे.


दैत्य लोक त्यावेळी मानवाला त्रास करत होते, त्यावेळी चौडेश्वर देवी वाट्याच्या रुपात या गांवामध्ये आली आणि मानवाच्या संरक्षण करण्यासाठी हा अवतार घेत असते. सांगली शहरात जोगण्या उत्सव हा ज्येष्ठ अमावास्येला संध्याकाळी 7 वाजता सुरु होतो. काळी साडी हातात सूप आणी चेहऱ्याला तडकडीचा मुखवटा अशा वेशात तडकडताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते. 


कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे थेट स्मशानात संध्याकाळी 6 वाजता या तडकडताई च्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजार असतात. सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षताने तिचा विवाह पार पडतो. विवाह पार पडल्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या हातातील सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला कि मुलांवरील इडा पिडा टळते अशी आख्यायिका आहे. 


अमावस्येचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आषाढातल्या पौर्णिमेपर्यंत शहरातील ठराविक भागात जाऊन ती जोगवा मागते. तडकडताईचा दरारा हा खूप मोठा असतो. अनेक लहान मुलेच नाहीत तर मोठी मुलेही या तड्कडताईला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरु असलेली ही परंपरा आता 21 व्या शतकातही जपली जात आहे.