Mahalaxmi Atta Chakki Sangli: आतापर्यंत सांगलीचा भडंग , द्राक्षे, बेदाणा, हळद, वीणा परदेशात निर्यात झालेले आपण ऐकलं असेल, पण आता सांगलीमधून एक आटाचक्की थेट अमेरिकेला पाठवण्यात येणार आहे. सांगलीत महालक्ष्मी आटाचक्की हा आटाचक्कीचा प्रसिद्ध ब्रँड असून अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका ग्राहकाच्या आग्रहाखातर 22 किलो वजनाची आणि अर्धा एचपी पॉवरची महालक्ष्मी आटाचक्की डिझाईन करण्यात आली आहे. ती आता मुंबई आणि पुढे विमानामार्गे अमेरिकेत जाईल.
एका नातेवाईकाकडून महालक्ष्मी आटाचक्की बाबत कल्पना
साधारण 50 ते 70 किलोपर्यंतच्या आटाचक्कीचे आतापर्यंत महालक्ष्मी आटाचक्की समूहात उत्पादन केले जात होते, पण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ग्राहकाच्या आग्रहाखातर आणि विमानाने अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन आटाचक्कीच्या डिझाईन मध्ये बदल करत वजनात कमी करुन ते जवळपास 22 किलो इतके करून आटाचक्कीचे नवीन छोटे मॉडेल डिझाइन करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये अजिंक्य सुरेश ससे वास्तव्यास आहेत. त्यांना घरीच धान्य दळणारी एक आटाचक्की हवी होती. यासाठी त्यांनी शोध सुरु केल्यानंतर त्यांना मुळच्या कोल्हापूरमधील एका नातेवाईकाकडून महालक्ष्मी आटाचक्की बाबत कल्पना दिली. त्यांनी महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे प्रमुख सुभाष माने यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आटाचक्की पाठवण्याबाबत विचारणा केली.
सुभाष माने यांनी देखील आटाचक्की पाठवण्याबाबत तयारी दर्शवली, पण अडचण येत होती त्या आटाचक्कीच्या वजनाची. साधारणत 50 ते 70 किलोपर्यंतच्या आटाचक्कीचे महालक्ष्मीकडून निर्मिती केली जाते. तथापि, या ग्राहकाच्या आग्रहाखातर आणि विमानाने अमेरिकाला आटाचक्की पाठवायची आहे हे लक्षात घेऊन 22 किलो वजनाची आटाचक्कीचे मॉडेल डिझाइन करण्यात आले. उंची 2 फूट आणि रुंदी 1 फूट ठेवण्यात आली आणि अर्धा एचपी पॉवरची मोटर बसवण्यात आली. ऑर्डर आल्यापासून एक महिन्याच्या आत ही खास आटाचक्की बनवण्यात आली.
आटाचक्कीच्या दारावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला स्थान
आपली आटाचक्की अमेरिकेला जाते याचा आनंद महालक्ष्मी आटाचक्की उद्योग समूहाचे सुभाष माने यांना इतका झाला, की त्यांनी अमेरिकेची खास ओळख असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या चित्राला आटाचक्कीच्या दारावर स्थान दिले. यामुळे या आटाचक्कीला अमेरिकेन लुकही आला.
ग्राहकाला मूळ किमतीपेक्षा आटाचक्की पाठवण्याचा खर्च अधिक
आटाचक्कीच्या मूळ किमतीपेक्षा ही आटाचक्की अमेरिकेला पाठवण्याचा खर्च जास्त आला आहे. मात्र, तरीही अमेरिकेतील ग्राहकाने आपल्या मायदेशातील आटाचक्की अमेरिकेत येते याचा आनंद होता आणि महालक्ष्मी आटाचक्कीच्या मालकांनी आपली आटाचक्की अमेरिकेत जाते याचा आनंद होता. यामुळे त्यांनीही खुशीने ही खास आटाचक्की डिझाईन केली आणि अमेरिकेला पाठवण्याची तयारी दर्शवली.
इतर महत्वाच्या बातम्या