Jayant Patil Vs Chandrakant Patil: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल (25 सप्टेंबर) सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती.
मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या?
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून राजारामबापू पाटील यांचे नाव घेऊन झालेल्या टीकेचे निमित्त करून जयंत पाटील नावाची सभा सांगलीत झाली. यानिमित्ताने विजनवासात गेलेले जयंत पाटील पुन्हा प्रकाशझोतात आले, पण असं करून राजकारणाच्या प्रकाशझोतात येता येत नाही हे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसेल, पण जयंत पाटील बचाव सभेत गोपीचंद पडळकर बाजूला राहिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या कुटूंबावर टीका झाली. फडणवीस यांना आका, टरबुज्या अशा शब्दांत टीका करण्यात आली जी आम्ही चालू देणार नाही.
काचेच्या घरात बसून दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात
ते पुढे म्हणाले की, नाव न घेता एक अर्थमंत्री आणि त्याचा ऑनलाइन लॉटरी घोटाळा, एक ठाण्यातील आमदार आणि त्याची डायरी, एका पक्षाच्या नेत्याची नवी मुंबईतील मार्केट कमिटी हे नाव न घेता मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? तुम्ही धुतल्या तांदळागत आहात तर कशाला घाबरता? काचेच्या घरात बसून कुलूप लावून दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. राजारामबापू यांच्यावर पडळकर यांनी केलेल्या टीकेचे आम्ही समर्थन करणार नाही, पण हे कारण पूढे करून तुम्ही आमच्या नेत्यावर टीका करणार असाल तर ती आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी अशा पध्दतीची टीका टिप्पणी बंद करूया, असे पुढे येऊन सांगावे आम्ही 1 ऑक्टोबरचा इशारा मोर्चा मागे घेतो असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिले.
इतर महत्वाच्या बातम्या