Jayant Patil : इस्लामपूर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यानंतर इस्लामपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर एसटी बस चालवल्याप्रकरणी जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा याबाबत भाजप नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली आहे.
एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवलं असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची सजवलेली बस शहरातून स्वत: चालविली. त्याचे व्हिडिओ व फोटो सर्वत्र व्हायरल झाले. मात्र, इस्लामपूर भाजपने यावर आक्षेप घेत जयंत पाटील यांनी स्वत: प्रसिध्दीसाठी व कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीर बस चालविली असून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांच्याकडे केली.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना इस्लामपूर शहरातही नागरिकांची मोठी गर्दी होती. जयंत पाटील हे प्रसिध्दीसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात, बस चालविण्याचा प्रयोग हा बेजबाबदारपणाचे लक्षण असून त्यांच्याकडे बस चालविण्याचा कोणताही अनुभव नाही, दुर्दैवाने काही घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता लोकशाहीचा सन्मान करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी केली.
गुन्हा दाखल झाला ना,ही तर संपुर्ण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते व नागरिक पोलिस ठाण्यावर मोर्चा काढतील असा इशाराही मोरे यांनी दिला.
जयंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाकडे चालक म्हणुन नियुक्ती नाही. त्यांच्याकडे आरटीओ या सक्षम अधिकार्यांचे बस चालविण्याचा बॅच बिल्ला नसताना, जड वहान चालक म्हणुन आवश्यक असणारे लायसन्स नसताना इस्लामपूर शहरातून बस चालविली गेली. शहरात गर्दी होती, दुर्घटना घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते, सरकारी व सार्वजनिक वापराचे वहान चालविणे ही गंभीर बाब आहे. हे लक्षात घेऊन 3/180, 5/181 या कलमातंर्गत गुन्हा दाखल करावा व चौकशी अंती इतर योग्य कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपकडून निवेदनात केली आहे.