Islampur Vidhan Sabha constituency : राज्याचं लक्ष लागलेल्या इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघात यंदा लक्षवेधी लढत झाली. महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांनी भाजपच्या निशिकांत पाटलांवर जवळपास 12 हजार मतांनी मात केली आहे. जयंत पाटील यांना 1,08,048 मतं मिळाली तर भाजपच्या निशिकांत पाटील यांना 96,137 मतं मिळाली. जयंत पाटलांनी 11,911 मतांनी विजय मिळवला. पण यंदा मात्र त्यांचं मताधिक्य घटल्याचं दिसून आलं.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून सलग आठ वेळा निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्यासमोर भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेल्या निशिकांत पाटील यांचे आव्हान होतं. 2019 साली निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळेच ही जागा शिवसेनेला न सोडता अजित पवारांनी आपल्याकडे घेत निशिकांत पाटलांना उमेदवारी दिली.
मताधिक्य घटलं
इस्लामपूर-वाळवा म्हणजे जयंत पाटलांचे होमग्राऊंड. या ठिकाणी कारखाना आणि अनेक सहकारी संस्था उभा करून जयंत पाटलांनी आपलं राजकीय नेटवर्क बळकट केलंय. सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हजारो रोजगार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचा फायदा जयंत पाटलांना होतोय. त्या बळावरच जयंत पाटील हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतात.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांसोबत कायम राहिले. जयत पाटील हे शरद पवारांसोबत राहिल्याने आणि त्यांची बाजू सांभाळल्याने ते अजित पवारांच्या टार्गेटवर होते.
2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं?
2019 साली झालेल्या निवडणुकीत जयंत पाटलांना 1,15,563 मतं मिळाली होती. जयंत पाटलांनी 72,169 मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या गौरव नायकवडी यांनी 35 हजार मतं घेतली होती. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या निशिकांत पाटील यांनी 43 हजारांवर मतं घेतली होती.
ही बातमी वाचा: