सांगली : पलूस कडेगाव मतदारसंघात पारंपरिक विरोधी गट असलेल्या कदम -देशमुख गटात लढत होतेय. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. कदम-देशमुख गटातील हे दोन तरुण नेते प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने येत आहेत.
पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम प्रथमच आमदार बनले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पलूस कडेगावची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि या निवडणुकीत देखील काँग्रेसचे विश्वजित कदम विक्रमी मतांनी निवडून आले. यंदा मात्र हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले संग्रामसिह देशमुख हे महायुतीचे उमेदवार आहेत. यामुळे सुरूवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.
विश्वजीत कदमांचं मोठं नेटवर्क
पतंगराव कदमांच्या निधनानंतर विश्वजीत कदमांनी गटाची धुरा सांभाळून राजकारण केलं. भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखाना, सूत गिरणी तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी हजारो जणांना रोजगार दिला. त्यामुळे यंदाही ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.
या मतदारसंघात शेकडो कोटींची विकासकामे जिल्हा परिषद माध्यमातून मार्गे लावली आहेत. याच बरोबर टेंभू, ताकारी योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विस्तारीत कामांना गती दिली असल्याचा दावा संग्रामसिंह देशमुखांनी केला. कामाच्या जोरावर यंदा पलूसकर आपल्याला मतदान करतील असा विश्वासही त्यांना आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विश्वजीत कदमांनी सांगली पॅटर्न राबवून आपली ताकद दाखवून दिली. अपक्ष असलेल्या विशाल पाटलांच्या मागे सर्व ताकद लावून त्यांनी निवडून आणलं. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या वर्तुळात आणि जिल्ह्यात विश्वजीत कदमांची ताकद वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता विजयाची हॅट्रिक करून विश्वजीत कदम आपला दबदबा कायम ठेवण्याच्या तयारीत आहेत.
2019 सालचा निकाल काय?
गेल्या निवडणुकीचा विचार करता काँग्रेसच्या डॉ. विश्वजीत कदमांना 1,71,497 इतकी मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकाची मतं ही नोटाला मिळाली होती. ती 20, 651 इतकी होती. तर शिवसेनेचे संजय विभुते हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना फक्त 8,976 मतं मिळाली होती.
ही बातमी वाचा: