Sangali News: सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यातील 210 गावातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा (Tembhu Lift Irrigation Project) जन्म झाला. याच टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आमदार सुमन पाटील (Suman Patil) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. मुलगा आणि राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पाटीलही (Rohit Patil) उपोषणासाठी उपस्थित राहणार आहे. पाण्याच्या बाबतीत आम्हाला राजकारण करायचं नाही, असंही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. 


टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी आता शरद पवार गटाच्या आमदार सुमन आर आर पाटील आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.  त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रोहीत पाटीलही उपोषणाला बसणार आहेत. तसंच पाण्याच्या बाबतीत आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. 


जाणूनबुजून वेळ घालवला जातोय का? रोहित पाटलांचा सवाल 


रोहित पाटील म्हणाले की, आमदार सुमन पाटील यांनी टेंभू योजनेमध्ये 17 गावांचा सुप्रमा मंजूर करण्यात यावा, यासाठी आमरण उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत आबा होते, तोपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून तासगाव आणि कंवठेमहाकाळ तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण आबा गेल्यानंतर सावळजसह आठ गावं होतं. त्याचसोबत कंवठेमहाकाळमधील काही गावं टेंभू योजनेत सहभागी केलेली आणि काही गावं पाणी उपलब्ध नसल्यामुळे शिल्लक होती. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लवादाची बैठक यशस्वी झाली होती. त्यानंतर या भागासाठी वाढीव पाणी मंजूर करुन घेतलं आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार असतानाही त्याला का वेळ लागतोय, हा सवाल आम्ही शासनाला विचारणार आहे. तसेच, जाणूनबुजून याला वेळ घालवला जातोय का? असा सवालही रोहित पाटलांनी उपस्थित केला आहे. 


निवडणुकाजवळ आहेत म्हणून काम करायचं, ही वृत्ती आरआर आबा आणि त्यांच्या कुटुंबियांची नाही : रोहित पाटील 


प्रसिद्धी वाढली म्हणून आमदार सुमन पाटील आणि त्यांचा मुलगा मी रोहित पाटील आम्ही उपोषण करण्याची नौटंकी करतोय, असं बोललं जात आहे. खरं तर हा विषय पाण्याचा आहे, यावर राजकारण करायचा नाही आणि विरोधकांवर अजिबात बोलायचं नाही, हे आम्ही ठरवलं होतं. पण काही लोक वल्गना करत आहेत, असं रोहित पाटील म्हणाले. माझं म्हणजेच, आमदार सुमन पाटील यांच्या मुलाचं भविष्य अंधारात जाईल असं काही लोक म्हणतायत, मात्र प्रत्येक विषय असेल, प्रत्येक प्रश्नासाठी आरआर आबांच्या कुटुंबानं त्यांच्या पश्चातसुद्धा कसं काम केलंय, हे इथल्या प्रत्येक कुटुंबानं पाहिलंय, असंही रोहीत पाटील म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे काम करायचं ही वृत्ती आबांच्या कुटुंबियाची नाही, असं रोहित पाटील म्हणाले. 


टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई आर. आर पाटील आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. मुलगा रोहित पाटील आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन आमदार सुमनताई पाटील यांचं हे उपोषण सुरू होणार आहे. काही गावांचा टेंभूत समावेश करावा, अशी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात येत नसल्याने आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी राज्य सरकार विरोधात थेट बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत गावाचा टेंभू योजनेत समावेश होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार देखील जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 


दरम्यान, या आंदोलनावर खासदार संजयकाका पाटील यांनी टीका केल्यानंतर रोहित पाटील यांनी आम्हाला पाण्याच्या विषयात राजकारण करायचं नाही, कुणाला काहीही टीका करू द्या. मतदारसंघातील जनतेला कोण राजकारण करू पाहत आहे, हे माहीत आहे, असं म्हणत रोहित पाटील यांनी थेट खासदार संजयकाका पाटील याच्यावर टीका करणं टाळलं आहे.


पाहा व्हिडीओ : Rohit Patil Sangli : 'निवडणुका लागल्या की काम करायचं ही वृत्ती आबा आणि त्यांच्या कुटुंबाची नाही'