Sangli Loksabha : सांगलीमध्ये एक पाटील मैदानात, विरोधात दोन पाटलांपैकी कोणाला संधी मिळणार?
काँग्रेस सांगली लोकसभेच्या जागेवर ठाम आहे. त्यामुळे काँग्रेस जागा ठेवण्यात यशस्वी होणार की संजयकाका आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यात हा लोकसभेचा आखाडा रंगणार हे पाहावे लागेल.
सांगली : सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच संधी देण्यात आली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीमधून सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. त्यामुळे सांगली लोकसभेच्या आखाड्यात यंदा दोन पैलवानांमध्ये सामना होण्याची चिन्हे आहेत. मात्र, काँग्रेस सांगली लोकसभेच्या जागेवर ठाम आहे. त्यामुळे काँग्रेस सांगलीची जागा स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होणार की संजयकाका आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यात हा लोकसभेचा आखाडा रंगणार हे पाहावे लागेल.
मैदानात पैलवान असू द्या किंवा विशाल पाटील असू द्या, त्यांना चितपट करू
सांगली लोकसभेला मागील दोन टर्म या ठिकाणी भाजपकडून खासदार संजयकाका पाटील खासदार म्हणून निवडून आले आहेत. तिसऱ्यांदा भाजप संजयकाका यांना लोकसभा उमेदवारीची संधी देणार का याची धाकधूक असतानाच पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारीचा माळ संजयकाकाच्या गळ्यात भाजपने टाकली. त्यामुळे सांगली लोकसभेच्या आखाड्यात एक पैलवान प्रचारासाठी सज्ज झाला आहे. मैदानात पैलवान असू द्या किंवा विशाल पाटील असू द्या, त्यांना चितपट करू असा संजयकाकांनी निर्धार केला आहे. दुसरीकडे विरोधी म्हणजे महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून तिढा कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना शिवबंधन बांधत त्यांची अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेस सांगलीच्या जागेवर ठाम आहे. काँग्रेसलाच ही जागा जाईल आणि विशाल पाटील उमेदवार असतील असे काँग्रेस नेते सांगत आहेत.
चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेतून महाविकास आघाडीमधून आपली उमेदवारी पक्की असल्याचे सांगत आहेत. मातोश्री मंदिरातून सांगली लोकसभा जागेच्या तिकिटासाठी आपल्याला शब्द देण्यात आल्याने कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि जिंकणार असा चंद्रहार पाटील यांनीही विश्वास व्यक्त केला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघावर एक दृष्टिक्षेप
- 2014 साली नरेंद्र मोदीच्या लाटेत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना 6,11,563 मते मिळाली
- तर काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांना 3,72,271 मते मिळाली
- म्हणजे भाजपचे संजय पाटील यांचा 2,39,292 मताधिक्याने विजयी झाला
- 2019 साली पुन्हा भाजपकडून संजयकाकाना तिकीट भेटले आणि त्यांना 5,08,995 इतकी मते मिळाली
- तर दुसरीकडे स्वाभिमानी-काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना 3,44,643 मते मिळाली
- तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर 3,00,234 इतकी मते मिळाली
- वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाचा थेट फायदा झाला.
- भाजपचे संजय पाटील यांना झाला आणि ते 1, 64,352 मताधिक्याने विजयी दुसऱ्यादा खासदार झाले
आता तिसऱ्यादा खासदारकीची माळ गळ्यात घालण्यास संजयकाका इच्छुक आहेत. मात्र, संजयकाकांचा हा वारू रोखण्यासाठी नेमकी कुणाची उमेदवारी फायनल करणार आणि त्यात महाविकास आघाडीला यश येणार का? हे पहावे लागेल. त्यामुळे संजयकाकाच्या विरोधात कोण याची उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या