सांगली : महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धा पाहिली की, आपल्यालाही पैलवान व्हावे वाटते. त्यादृष्टीने जीममध्ये जाऊन व्यायाम सुरू केला जातो, पण ते सातत्य आणि मेहनत घेण्याची तयारी पूर्णत्वास न गेल्याने पुन्हा माघार घेतली जाते. मात्र, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असे खिताब मिळवणारे पैलवान त्यांच्या याच कष्ट, सातत्याने, मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचलेले असतात. मंत्री उदय सामंत (Uday samant) यांनीही असा किस्सा शेअर केला आहे. चंद्रहार पाटील यांच्यासारखी आपलीही तब्येत व्हावी असा मी विचार केला, खुराक पण चालू करावा म्हटले. पण, चंद्रहार पाटीलचा व्यायाम करत असलेला एक मी व्हिडिओ पाहिला आणि नंतर मला कळले की हे आपल्याला झेपणार नाही. आपली हाडे मोडून घेण्यापेक्षा तब्येत बनवायचा मी नादच सोडून दिला, असा मजेशीर किस्सा उदय सामंत यांनी सांगलीतून (Sangli) सांगितला.
शिवसेना ठाकरे गटातून काही दिवसांपूर्वीच चंद्रहार पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे उदय सामंत यांच्या नेतृत्वातच चंद्रहार पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता, सीमेवरच्या जवानांसाठी रक्त संकलन करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या 'सिंदूर महारक्तदान यात्रेच्या'निमित्ताने मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या 'धर्मवीर एक्सप्रेस' या रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी चंद्रहार पाटील यांच्यासमवेतचा हा किस्सा सांगितला. सीमेवरच्या जवानांसाठी रक्त संकलन करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने 'सिंदूर महारक्तदान यात्रा' काढण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र 22 डबे असलेली 'धर्मवीर एक्स्प्रेस' ही विशेष रेल्वे सांगली रेल्वे स्थानकातून जम्मू काश्मीरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली आहे. उदय सामंत यांच्या हस्ते या 'धर्मवीर एक्सप्रेस' रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला. 1 हजार दोनशे तरुणांना घेऊन सांगलीतून ही यात्रा रवाना झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी जम्मू कश्मीरमधील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हे तरुण रक्तदान करणार आहेत.
रक्तदात्यांच्या सोयींसाठी 200 स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत, ही यात्रा 7 ऑगस्टला जम्मू आणि उधमपूर येथे पोहोचेल. तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री यात्रेचे स्वागत करणार आहेत. क्रांतिदिनी आणि रक्षाबंधनदिवशी जम्मूमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये एक हजार तरुण, महिला, माजी सैनिक रक्तदान करतील. जम्मू येथे शिवसेनेच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर निवडक दोनशे जणांना सोबत घेत विशेष विमानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
हेही वाचा
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार