Maharashtra Sangli News : संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra News) परतीच्या पावसानं (Rains) हाहाकार उडवून दिला. पावसानं जाताजाता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. एकीकडं राज्यभरातील शेतकरी परतीच्या पावसानं बेजार झाला, पण या परतीच्या पावसाचा फटका लोककलावंतांनाही बसला आहे. परतीच्या पावसाचा फटका काळू-बाळूच्या फडासह अनेक तमाशाच्या फडांना बसला आहे. विदर्भ, खानदेशातील अनेक प्रयोग ठप्प झाले आहेत.
उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेले आणि तमाशा कलाप्रकारावर हुकूमत गाजविणारे सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील 'काळू-बाळू'चे मोठे तमाशे तात्पुरते बंद पडले आहेत. कारण आहे परतीचा पाऊस. दोन वर्ष कोरोनामुळं प्रेक्षकांनी फडाकडे पाठ फिरवली होती. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे हे तमाशा फड आर्थिक संकटात सापडले होते. एकीकडे आधीपासूनच कोरोना आणि इतर कारणांमुळे तमाशा बंद असल्यानं उपासमार आणि आर्थिक चणचण सुरू आहे. तर दुसरीकडे यंदा परतीच्या पावसामुळे विदर्भ, खान्देशात तमाशाचे प्रयोग ठप्प आहेत. यावर्षी केवळ आठच फड विजयादशमीला रिवाजानुसार, लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पण परतीच्या पावसाचा त्यांनाही फटका बसला. एक दोन शो करून हे फड विदर्भ आणि खान्देशात बसून आहेत. पुढील काळात होणारा यात्रांकडे या तमाशा फडांच लक्ष असून त्यावेळी तर तमाशा सुरू व्हावेत, अशी अपेक्षा धरून हे सर्व कलाकार हातावर हात ठेऊन बसले आहेत.
काळू-बाळूची तमाशा टीम दसऱ्यानंतर प्रयोगासाठी बाहेर पडते. मात्र यंदा मराठवाडा सह अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा काळू बाळू तमाशा फड मालकांनी आता थेट जानेवारीतच प्रयोगासाठी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परतीच्या पावसानं एकीकडे शेतकरी अडचणीत असताना तमाशा फड मालकांना देखील फटका बसला आहे.
तमाशाला 80 रुपये इतका तिकीट दर आहे. तिकीट काढून तमाशा पाहण्यास येणारा प्रेक्षक वर्गही दिवसेंदिवस खूपच कमी होत चालला आहे. तमाशाला आता केवळ 35 ते 40 प्रेक्षकच येत असतात. या प्रयोगातून जमा होणाऱ्या गल्ल्यातून काहीच खर्च भागत नाही. त्यामुळे हे फड बंद ठेवले आहेत. संपूर्ण अर्थकारण बिघडल्यानं आणि यंदा तर परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान पाहता आणि लांबलेला पाऊस पाहता आता जानेवारीत बाहेर पडण्याचं नियोजन या तमाशा फड मालकांनी सुरू केलं आहे.
गावोगावच्या सुरू होणाऱ्या यात्रांवर आशा लावू फड मालक बसले आहेत. यात्रा कमिटीकडून 'सुपारी' घेऊन शो करण्याचा निर्णय या सहा फड मालकांनी घेतला आहे. महाराष्ट्रात जवळपास २225 लहान-मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येकवर्षी विजयादशमीला सर्व फड बाहेर पडतात. तत्पूर्वी महिनाभर कलाकारांची जुळवा-जुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था याचं नियोजन करण्यासाठी किमान 15 ते 20 लाख रुपये लागतात. दरवर्षी सावराकडून कर्ज काढून ही रक्कम उभा केली जाते. कला जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुनतुनं, पेटीमास्तर, नर्तिका असे 70 ते 80 कलाकार असतात. चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभरजणांचा लवाजमा असतो. लोखंडी स्टेज, तंबू, गेट, चार राहुट्या, जनरेटर, साऊंड सिस्टिम हे साहित्य आणि कलाकारांचा लवाजमा नेण्यासाठी पाच ट्रक आणि एक जीप असते. फडातील सर्वांचं दोनवेळचे जेवण आणि वाहनांतील डिझेल हा सर्व डोलारा सांभाळताना तोटाच होतो.