Sangli : आटपाडीमध्ये वरद हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात रूग्णावर मंत्रतंत्र करून धर्मांत करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित ख्रिस्ती धर्म प्रसारक भोंदूबाज संजय गेळेला आटपाडी पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, संजय गेळेच्या (Sanjay Gele) आतापर्यंतच्या या सगळ्या कारभाराची, संपत्तीची चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भाजप आमदार राम सातपूते मोर्चात सहभागी झाले. 


भोंदूबाज संजय गेळे पत्नी अश्‍विनीसह रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जाऊन रूग्ण तरूणीच्या कपाळावर हात  ठेवून मंत्राद्बारे उपचार करण्याचा  व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आल्याने हा प्रकार धर्मांतराचा असल्याचा आरोप हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी गेळे दांपत्याविरूध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रविवारी गेळे दांपत्याला अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी एक दिवस बंद ही पाळण्यात आला होता. आता ख्रिस्ती धर्म प्रसारक असलेल्या या संजय गेळेच्या कारभाराची, संपत्तीची  चौकशी करा या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे आटपाडीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले.


भोंदूबाज संजय गेळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 


दरम्यान, आटपाडीमधील कथित ख्रिस्ती धर्म प्रचारक संजय गेळेला आटपाडी पोलीसांनी सांगलीतून अटक केली आहे. आटपाडीमधील वरद हॉस्पिटलमध्ये संजय गेळे व पत्नी अश्विनी या दोघांनी अतिदक्षता विभागात महिला पेशंटच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून तंत्रमंत्र, जादूटोण्याने भोंदुगिरी करत अंधश्रध्दा पसरवली होती. याबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती. आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. बुधवारी रात्री सापळा रचून सांगलीत संजय गेळेला अटक केली. त्याची पत्नी अश्विनी अद्याप फरार आहे. आरोपी संजय गेळेला आटपाडी नायालयासमोर हजर केले असता नायालयाने त्याला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय गोळे आणि त्याची पत्नी अश्विनी गोळे यांनी (दोघेही रा. आटपाडी, जि. सांगली) अंगी दिव्यशक्त असल्याचे भासवून तसेच जादूटोणा करण्याच्या उद्देशाने वरद हाॅस्पिटलमधील अतिदतक्षता विभागात रुग्णाचे नातेवाईक असल्याचे सांगून घुसले होते. यानंतर त्यांनी रुग्णाच्या डोक्यावर हात फिरवत टॅबमधील मजकूर वाचून दाखवला होता. तसेच बोटाने शस्त्रक्रिया करत असल्याचे भासवून भोंदूगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. धनवडे यांनी आपल्या तक्रारीत आटपाडीत बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम  जाणून-बुजून सुरू असल्याचे म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या