Gopichand Padalkar News: विधानपरिषदेतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज  देखील दाखल केला आहे. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे पडळकर यांचे मूळ गाव असून गावातील बहुतांश नागरिकांनी गावच्या बैठकीत हिराबाई पडळकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्याचा चंग देखील बांधला आहे. 


पडळकरवाडीमध्ये आतापर्यंत बिनविरोध निवडणुका होत आले आहेत. यावेळी देखील निवडणूक बिनविरोध करण्याचा गावकऱ्याचा प्रयत्न आहे. तहसीलदार कार्यालय, आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई कुंडलिक पडळकर यांनी सरपंच पदासाठी काही गावकऱ्यांसोबत जात उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. उद्या अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे. यामुळं या गावातून अन्य कोण सरपंच पदासाठी अर्ज भरतेय की हिराबाई पडळकर यांची निवड बिनविरोध होतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हिराबाई पडळकर यांनी म्हटलं की, मी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. तीनवेळा गावात निवडणुका झालेल्या नाहीत, यंदाही निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे, असं त्या म्हणाल्या. सर्व गावकऱ्यांनी माझं नाव निश्चित केलं, त्यानंतर आम्ही आटपाडीला अर्ज भरण्यासाठी गेलो. गावकरी माझ्या सोबत आहेत, त्यांची जी काही कामं असतील ती मी करेल. यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचं सहकार्य असेलच, असंही त्या म्हणाल्या. माझा प्रचार करण्यासाठी माझं सर्व गाव पुढे आहे, त्यामुळं मला प्रचार करण्याची गरज नाही, असंही हिराबाई पडळकर यांनी म्हटलं.


आम्ही एक बैठक घेतली. त्यात गावकऱ्यांनी ठरवलं की गावात राजकारण होऊ द्यायचं नाही. शेवटी सर्वानुमते हिराबाई पडळकर यांचं नाव सरपंचपदासाठी निश्चित करण्यात आलं, असं एका गावकऱ्यांनं सांगितलं. गोपीचंद पडळकर यांचं गावासाठी असलेलं काम मोठं आहे. आता म्हणून त्यांच्या आईंना संधी देण्याचं गावानं ठरवलं आहे, असं एका तरुणाने सांगितलं.  त्यामुळं आता उद्या त्यांच्याविरोधात कुणी अर्ज भरतं की ही निवडणूक पुन्हा बिनविरोध होऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदी विराजमान होतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


ही बातमी देखील नक्की वाचा 


Maharashtra Border Dispute: आम्हाला महाराष्ट्र सोडून जायचंय! उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा विदर्भापर्यंत सीमेलगतच्या गावांचा महाराष्ट्रपासून फारकत घेण्याचा इशारा