First Women Maharashtra Kesari : राज्यात उत्सुकता लागून राहिलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या (First Women Maharashtra Kesari) महामुकाबल्यात सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने बाजी मारली. कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या सांगलीच्या प्रतीक्षाने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला अस्मान दाखवत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आणि चांदीची गदा पटकावली. प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरियाणाच्या इसारमध्ये जवळपास 5-6 ते महिने रूमपार्टनर होत्या. दोघींना एकमेकींच्या डावपेचांबद्दल अंदाज होता. तथापि बाजी मारण्यात प्रतीक्षा यशस्वी झाली. 


सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होत्या. अंतिम सामन्यात तुंग (जि.सांगली) येथील बागडे आणि कोल्हापूरची पाटील यांच्यात लढत झाली. सायंकाळी ही अंतिम लढत सुरू झाली. या अंतिम सामन्यात बागडे आणि पाटील मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र मध्यंतरानंतर बागडींने पाटीलला चितपट करीत चार विरुध्द दहा गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली. 


वैष्णवीचा आम्हाला अभिमान 


दरम्यान, वैष्णवी पाटीलचा पराभव झाला असला तरीही आम्हाला अभिमान आहे असल्याची प्रतिक्रिया ज्या तालमीत घडली त्या तालमीच्या वस्तादांनी दिली आहे. पहिल्याच महाराष्ट्र महिला केसरी सामन्यामध्ये कल्याणची वैष्णवी पाटील फायनलपर्यंत पोहोचली. प्रतिस्पर्धी खेळाडूचे वजन जास्त होते, त्यामुळे वैष्णवी पराजित झाली. तरीही आम्ही आनंदित आहोत आणि हा आनंद आम्ही फटाके फोडून पेढे वाटून साजरा करत आहोत, अशी प्रतिक्रिया वैष्णवी पाटील ज्या तालमीत घडली त्या तालमीतील वस्ताद पंच यांनी दिली आहे. 


कोण आहे प्रतीक्षा रामदास बागडी? (वय 21, वजन 76)



  • सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान

  • वसंत कुस्ती केंद्र सांगलीमध्ये सराव करते 

  • अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रतीक्षाकडू पदकांची कमाई

  • खेलो इंडियामध्ये सिल्वर पदकाची कमाई

  • राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सीनियर गटात सिल्वर पदकाची कमाई 


कोण आहे वैष्णवी पाटील? कल्याण (वय 19  वजन 65)



  • कल्याणची महिला पैलवान

  • जय बजरंग तालीम संघ, नांदीवलीमध्ये सराव करते

  • विशाखापट्टणम येथे सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप

  • ब्राँझ मेडलची कमाई