सांगली : सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एक कोटी 25 लाख रुपयांची कामे 'मॅनेज' केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत सांगली महानगरपालिका आयुक्त सुनील पवारांनी शहर अभियंतासह एकूण दहा अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. शहर अभियंत्यांची विभागीय चौकशी का करू नये? अशी नोटीस पवारांनी बजावली आहे. या नोटीसनंतर येत्या 48 तासांत कारणे दाखवा, असे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅममधील ( एन कॅप) हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला निधी देण्यात आला आहे. यातील सव्वा कोटी रुपयांची फूटपाथवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची 13 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. दहा लाखांच्या आतील अंदाजपत्रक तयार करून निविदा 'मॅनेज' केल्याचा आक्षेप नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी घेतला होता. त्याची दखल महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी घेतली. त्यानुसार संबंधित कामांची माहिती घेतली असता, संबंधित कामे 'मॅनेज' असल्याचे उघडकीस आले. यानंतर सर्व कामे आयुक्तांनी रद्द केली आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत केंद्राच्या निधीतून सव्वा कोटी रुपयांची फूटपाथवर पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची 13 कामे प्रस्तावित होती. त्या कामांचे अंदाजपत्रक दहा लाखांच्या आतील तयार केले. कंत्राटदारांसाठीच हा खटाटोप केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी कडक पाऊल उचलले आहे. आयुक्तांनी तब्बल दहा अधिकाऱ्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. यामध्ये शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नगर अभियंता परमेश्वर हलकुडे, भगवान पांडव, स्थापत्य अभियंता दीपक पाटील, पर्यावरण अभियंता अजित गुजराथी, प्रभारी शाखा अभियंता महेश मदने यांच्यासह चारही प्रभाग लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. येत्या ४८ तासांत नोटिशीवर खुलासा करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त पवारांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या