सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना इस्लामपुरातून (Islampur) जाहीर आव्हान दिलं आहे. भाजप सांगली (Sangli News) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मिळून 225 आमदार निवडून येतील. निशिकांत पाटील यांना आता 440 व्होल्टची ऊर्जा द्यायची, असे म्हणतबावनकुळेंनी  जयंत पाटील यांच्या होमपिचवर येत आव्हान दिले. 


निशिकांत पाटील यांना अप्रत्यक्षपणे ताकद देण्याची भूमिका


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इस्लामपूरमध्ये भाजपची महाविजय 2024 रॅली पार पडली. या रॅलीमधील मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना अप्रत्यक्षपणे ताकद देण्याची भूमिका घेतली आहे. निशिकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच जोमाने काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांना पक्षाचे तिकीट मिळवून देण्यासाठी मी स्वतः दिल्लीला देखील जाईन असे देखील बावनकुळे म्हणाले.


शरद पवार आपल्याकडे कोण कोण शिल्लक आहेत ते तपासत आहेत


जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी राष्ट्रवादी शून्यावर जाईल, अशी परिस्थिती होत चालली आहे. शरद पवार आपल्याकडे कोण कोण शिल्लक आहेत ते सध्या तपासत आहेत असेही बावनकुळे म्हणाले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी पुन्हा बसवून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला 440 चा करंट द्यायला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.


चंद्रशेखर बावनकुळेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन


जयंत पाटील यांच्या होम पिचवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. यावेळी बावनकुळे यांनी महाविजय रॅली दरम्यान सामान्य नागरिकांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इस्लामपूरमध्ये भाजपच्यावतीने ही भाजपाची महाविजय 2024 रॅली पार पडली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत कामगार मंत्री सुरेश खाडे, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या