सांगली : सांगली जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवर असणाऱ्या जत तालुक्यातील 10 कन्नड माध्यमांच्या शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचा अजब कारभार सांगली जिल्हा परिषदेने केला आहे. त्यामुळे आता कन्नड शाळेमध्ये मराठी माध्यमातील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार तरी काय? असा प्रश्न सांगली जिल्हा परिषदेच्या अजब कारभाराने उपस्थित झाला आहे. 


शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून


जत तालुक्यामध्ये 10 कन्नड शाळा आहेत. यामध्ये 11 मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या भोंगळ कारभारावर जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी आरोप केला आहे. कन्नड शाळेतील मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विक्रम सावंत यांनी केली आहे. त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. 


मराठी माध्यमातून शिक्षक कसं काय शिकवणार?


कन्नड शाळेतील कन्नड विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षक कसं काय शिकवणार? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने केलेल्या भोंगळ कारभारनामुळे कन्नड विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर राज्य सरकारच्या 132 कन्नड शाळा आहेत. मात्र, यामधील 10 शाळांमध्ये 11 मराठी माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती झाल्याने ते शिकवणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या