Sangliसांगली (Sangli) शहरातील मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर देशातील पहिली अखंड शिवज्योत तेवत राहणार आहे.  गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या या अनोख्या उपक्रमास महापालिकेची मान्यता मिळाली असून 6 जून रोजी ही  शिवज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी देशातील पहिली अखंड शिवज्योत उभारण्याची संकल्पना मांडली होती. या शिवज्योतीचा पायाभरणी कार्यक्रम देखील संपन्न झालाय.


देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 6 जून, 2022 रोजी साजरा होत आहे. या दिवशी सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर अखंड तेवत राहणारी ही देशातील पहिलीच शिवज्योत असणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून जगभरात अशी ज्योत स्थापन करणारे तज्ञ यासाठी काम करत आहेत.  


स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून शिवज्योत सांगली येथे आणण्यात येणार आहे आणि ती  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ कायमस्वरूपी तेवत ठेवली जाणार आहे. या शिवज्योत स्थापनेसाठी स्वराज्यातील सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्यावरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचं पाणी आणण्यात आलं आहे. आज या शिवज्योतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते  पाच किल्यावरची माती आणि 5 नद्याचे पाणी पायाभरणी करताना पाया भरणीत सोडण्यात आले. आपल्या इतिहासातूनच आपल्याला प्रेरणा मिळते, सांगली शहरातील तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व ध्येयवाद कायम तेवत राहावा यासाठी या ज्योतीची स्थापना करण्यात येत आहे. 6 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता या ज्योतीचे प्रज्वलन करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :