Living Root Bridge : ज्याला पर्यटनाची आवड आहे, विशेषत: नैसर्गिक पर्यटनाची आवड आहे त्याच्यासाठी ईशान्य भारतासारखी दुसरी जागा शोधूनही सापडणार नाही. ईशान्य भारतातील प्रत्येक गोष्ट खास अशीच आहे. या भूमीला निसर्गानं भरभरुन दान दिलं आहे. या भागात अनेक गोष्टी अशा सापडतील की ज्या निसर्ग निर्मित आहेत. मेघालयातील नद्यांवरील वृक्षांच्या मुळांपासून तयार झालेला नैसर्गिक पूल, ज्याला लिव्हिंग रुट हेरिटेज असंही म्हटलं जातं, हा एक निसर्गाचा अद्भूत आविष्कारच आहे. स्थानिक भाषेत या पूलांना jing kieng jri असं म्हटलं जातं. 


मेघालयातील बहुतांश भाग हा अत्यंत अवघड असा पहाडी आणि दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे. पावसाळ्यात या प्रदेशात मुसळधार पाऊस पडतोय. नैऋत्य मान्सून ज्या वेळी मेघालयातील गारो, खासी आणि जैंतिया या तीन पर्वतांच्या मध्ये फसतो, त्याला कुठेही बाहेर पडायला मार्ग राहत नाही त्यावेळी तो या प्रदेशात तुफान बरसतो. त्यामुळे हो प्रदेश म्हणजे भारतातील सर्वाधिक पावसाचे एक ठिकाण आहे. 


या अशा बसरणाऱ्या प्रदेशात आपल्या सरकारचे अभियंते सिमेंटचे किंवा स्टीलचे पूल बांधू शकत नाहीत, त्याना अनेक मर्यादा आहेत. पण निसर्गाला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे या ठिकाणी निसर्गानेच मानवाची मदत केल्याचं दिसून येतंय. हा एक निसर्गाचा अविष्कारच आहे. 


वडाच्या पारंब्यांच्या मदतीने पूल
या प्रदेशातील नद्यांच्या किनारी वडाची आणि रबराची झाडे मुबलक प्रमाणात उगवतात. वडाची झाडे मोठी झाल्यानंतर त्याच्या पारंब्या लोंबकळतात. मग त्या पारंब्यांच्या मदतीने या नद्यांवर रुट ब्रिज तयार करण्यात आले. वडाच्या पारंब्यांची नैसर्गिक इलॅस्टिसिटी जी असते ती या पूलांना अत्यंत मजबूत करते. या पारंब्या एकमेकांमध्ये अडकून वाढल्यानंतर त्यांच्यावर बांबू किंवा सुपारीची झाडे टाकली जातात. नंतर त्यावर दगडं रचली जातात, माती टाकली जाते आणि हे पूल चालण्यायोग्य केली जातात. रबराच्या झाडांचेही तसेच. त्याची मुळे मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्याचा वापर पूल तयार करण्यासाठी होतो. 


पाचशे वर्षे टिकणारे नैसर्गिक पूल
या प्रक्रियेने हे रुट ब्रिज पूर्ण करायचं झालं तर दहा वर्षाहून अधिक कालावधी लागतो. पण एकदा का हे पूल तयार झालं तर ते पाचशे वर्षे त्याला कोणताही धोका नसतो. हा पूल तयार करण्यासाठी कोणतीही आर्थिक किंमत मोजावी लागत नाही किंवा त्याच्या मेन्टेनन्सची चिंता नसते. 


या भागातील अनेक पूलांची लांबी ही 50 फुटांहून जास्त लांब आहे आणि याची रुंदी 5 ते 8 फुट इतकी आहे. हे पूल तुटेल, मोडेल किंवा ढासळेल याची आजिबात चिंता नाही कारण वडाच्या पारंब्यांनी ते एवढं मजबुत झालेलं असतं की त्यावर एकाचवेळी अनेक लोक उभे राहू शकतात. 


निसर्ग आणि मानवाच्या संबंधाचे उदाहरण
निसर्ग आणि मानवाच्या संबंधाचे सुंदर उदाहरण असणारे हे लिव्हिंग रुट ब्रिज मेघालयातील वेस्ट जैंतिया हिल्स जिल्हा आणि ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यामध्ये दिसतील. या प्रदेशात खासी आणि जैंतिया जमातीचे लोक राहतात. या लोकांनी या पूलाची निर्मिती केली आहे. 


या भागात अनेक ठिकाणी आपल्याला सुंदर असे डबल लिव्हिंग रुट ब्रिजही पहायला मिळतील. निसर्गाचा हा अविष्कार म्हणजे मानवाचे निसर्गावरचे आणि निसर्गाचे मानवावर असलेलं अवलंबन याचं सुंदर असं उदाहरण आहे. मानवाने निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही मानवाची काळजी घेतो हेच यातून स्पष्ट होतंय. आपल्या या अनोख्या रुपामुळे ही लिव्हिंग ब्रिज पर्यटकांचे खास आकर्षण असतात. 


या प्रदेशातील खासी जमातीच्या लोकांना या अशा पूलांच्या निर्मितीची सुरुवात कधी झाली हे माहित नाही. सर्वात जुने रेकॉर्ड हे चेरापूंजीच्या लिव्हिंग रुटबद्दल सापडतंय. ब्रिटिश लष्करी अधिकारी लेफ्टनंट हेन्री युल यांनी 1844 साली लिहिलेल्या आपल्या 'एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल' या जर्नलमध्ये या पूलाची नोंद केल्याचं सापडतं.  


आशियातील सर्वात स्वच्छ खेडेगाव अशी ओळख असलेल्या मॉवलिनॉंग या गावातही या प्रकारचे लिव्हिंग रुट ब्रिज पहायला मिळतील. मेघालयातील हे नैसर्गिक पूल निसर्गाचा एक अविष्कारच आहे. 


महत्वाच्या बातम्या :