मुंबई: प्रदूषण ही समस्या केवळ भारतासाठी नव्हे तर जगभरासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याचं दिसून येतंय. विकासाच्या नावाखाली विकसित देशांकडून अनेक प्रकल्प राबवले जातात पण त्याचा फटका मात्र विकसनशील देश आणि मागासलेल्या देशांना बसतोय असं दिसतंय. भारतातही प्रदूषणाची समस्या ही तीव्र आहे.
जगभराचा विचार करता प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात असं 2019 सालची आकडेवारी सांगतेय. भारतात एका महिन्यात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झालेत त्यापेक्षा 11 पटींनी जास्त मृत्यू हे प्रदूषणामुळे झाल्याचं स्पष्ट आहे.
भारतात प्रदूषणामुळे होणारे मृत्यू (2019)
- दरवर्षी होणारे मृत्यू- 23.5 लाख
- दर महिन्याला होणारे मृत्यू- 1.96 लाख
- दर दिवशी होणारे मृत्यू- 6528
- दर तासाला होणारे मृत्यू-272
- दर मिनीटाला होणारे मृत्यू- 5
भारतात कोरोनामुळे झालेले मृत्यू (2019)
- एकूण मृत्यू- 5.24 लाख
- दर महिन्याला झालेले मृत्यू- 18,091 हजार
- दर दिवशी झालेले मृत्यू- 603
- दर तासाला झालेले मृत्यू- 25
लॅन्सेट या सायन्स मॅगेझिनने या संबंधित द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ रिपोर्ट, 2019 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये खालील निरीक्षणं मांडण्यात आली आहेत.
1. सन 2019 साली प्रदूषणामुळे 90 लाख मृत्यू झाले.
2. भारतात 93 टक्के भूभागावर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या गाईडलाईन्सपेक्षा जास्त प्रदूषण असल्याचं स्पष्ट आहे.
3. 2019 साली जगभरातील इतर देशांची तुलना करता प्रदूषणामुळे भारतात सर्वाधिक मत्यू झाले आहेत.
4. भारतात प्रदूषणामुळे दरवर्षी 23.5 लाख मृत्यू होतात.
5. त्यापैकी 16.7 लाख मृत्यू हे हवा प्रदूषणामुळे होतात.
6. जवळपास 5 लाख मृत्यू हे जल प्रदूषणामुळे होतात.
7. गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशामध्ये हवा प्रदूषणाची पातळी ही तीव्र आहे.
प्रदूषणामुळे होणारे आर्थिक नुकसान
सन 2019 सालचा विचार केला तर प्रदूषणामुळे जगाच्या जीडीपीमध्ये 350 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. हे प्रमाण एकूण जीडीपीच्या 6.2 टक्के इतकं आहे. यामध्ये हात स्वच्छ न धुणे, दुषित पाणी पिणे या सारख्या पारंपरिक गोष्टीमुळे एक टक्के जीडीपीचे नुकसान झालं आहे तर ओझोन प्रदूषण, पीएम प्रदूषण सारख्या आधुनिक गोष्टींमुळे एक टक्के जीडीपी घसरला आहे.
जागतिक स्तरावरील हवेचा गुणवत्ता अहवाल, 2021 प्रकाशित करण्यात आला असून त्यामध्ये भारताबाबत काही निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. ती खालीलप्रमाणे,
1. भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश आहे.
2. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेची मानकं ठरवली आहेत. भारतातील एकही शहर ती मानकं पूर्ण करत नाहीत.
3. राजस्थानमधील भिवंडी हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
4. उत्तर भारतात सर्वाधिक प्रदूषण होतंय.
5. दिल्ली जगभरातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे. सलग चौथ्यांदा दिल्लीचा यामध्ये पहिला क्रमांक लागतोय.
6. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या मानकांच्या तुलनेत भारतातील प्रदूषणाचे प्रमाण हे 20 पटींनी जास्त आहे.
7. जगभरातील 100 शहरांमध्ये भारतातील 63 शहरांचा समावेश आहे.
यामुळे भारताचे दरवर्षी 11.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान होतंय.
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट रिपोर्ट, मे 2022
1. सन 2100 पर्यंत जागतिक तापमानामध्ये 2.4 डीग्री सेल्सिअस ते 4.4 डीग्री सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
2. सन 2100 पर्यंत उष्णतेच्या लाटांमध्ये तीन ते चार पटींनी वाढ होणार आहे.
3. सन 2030 पर्यंत 7.4 कोटी ते 9 कोटी भारतीयांना उपासमारीला सामोरं जावं लागणार आहे.
जागतिक ताममानवाढीमुळे 2041 सालापर्यंत 1.80 टक्के पीकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे तर 2080 पर्यंत 23.60 टक्के घट होण्याची शक्यता आहे.
जल प्रदूषण
भारतात जगभरातील 16 टक्के लोकसंख्या राहते पण स्वच्छ पाण्याचे स्त्रोत केवळ 4 टक्के आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार शहरांना 2030 पर्यंत तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. जल प्रदूषणामुळे आरोग्याची समस्या उद्भवत असून त्यामुळे आरोग्यावर दरवर्षी 4,580 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतोय. अर्सेनिकमुळे केवळ पश्चिम बंगालमध्ये 1.5 कोटींहून जास्त लोक बाधित आहेत तर फ्लुराईडमुळे 19 राज्यातील एक कोटीहून जास्त लोक बाधित आहेत. भारतात पाणी प्रश्न गंभीर असून ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला सरासरी 35 मिनीटे पाण्यासाठी द्यावी लागतात.
ध्वनी प्रदूषण
ध्वनी प्रदूषण हे डेसिबलमध्ये मोजला जातो. मानवी कानाला त्रास होणारा प्रत्येक आवाज हा ध्वनी प्रदूषणामध्ये गणला जातोय. 80 डेसिबल ते 100 डेसिबलचा आवाज हा मोठा आवाज समजला जातोय. तर 100 डेसिबलच्या वरचा आवाज हा धोकादायक समजला जातोय. जागतिक आरोग्य संघटनेने 55 डेसीबल इतका आवाज योग्य असल्याचं सांगितलं आहे.
जगभरात ढाका या ठिकाणी 119 डेसिबल इतके ध्वनीप्रदूषण होतंय. तर भारतातील कोलकाता या ठिकाणी 89 डेसिबल आणि दिल्लीमध्ये 83 डेसिबल असा ध्वनी प्रदूषणाचा स्तर आहे.
लहान मुले आणि प्रदूषण
जगभराचा विचार करता 15 वर्षाच्या आतील 93 टक्के मुलांना ही पार्टिक्युलेट मॅटर 2.5 म्हणजे PM2.5 पासून मोठा धोका आहे. 2016 साली प्रदूषणामुळे जगभरात 15 वर्षाच्या आतील 6 लाख मुलांचा मृत्यू झाला होता. दहा पैकी एक मृत्यू हा पाच वर्षाच्या आतील मुलांचा आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने काय पाऊले उचलली आहेत?
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 2024 सालापर्यंत पार्टिक्युलेट मॅटरमध्ये 20 ते 30 टक्के घट करण्याचा उद्देश आहे. देशातील 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या 42 शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी 2217 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.