Maharashtra Sangli News : सांगलीत (Sangli) चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत (Jath) तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली. 


महाराष्ट्रातील (Maharashtra) सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांना चारही साधूंना मारहाण केली. 




मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून गैरसमजुतीतुन चारही साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना जत तालुक्यातील लवंगा येथे घडली आहे. उमदी पोलिसांकडून तातडीनं कारवाई करून नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवलं गेलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेलागत असणाऱ्या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना गाडीतून ओढून पट्ट्यानं, काठीनं मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.   


उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थीनीस केली असता, मुलं चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण केली. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वच स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी साधूंनी आपलं ओळखपत्र, आधार कार्ड याबाबतची सविस्तर माहिती जमावाला देऊनही जमावानं न ऐकल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.