Sangli News : उसतोड मजुरांच्या मुलांनाही भाकरी तयार करता यावी यासाठी भाकरी करण्याचा सराव हा स्पर्धेच्या माध्यमातून जत तालुक्यातील कुलाळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आला. यामुळे आई-वडिलांबरोबर ऊसतोडीच्या वेळी मुलाचे होणारे स्थलांतर थांबले आणि शाळेतील मुलांच्या गळतीही कमी झाली.  पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांना स्वयंपाकाचे कौशल्य अवगत असावे या हेतूने जिल्हा परिषदेच्या या शाळेने भाकरी बनवण्याच्या अनोख्या स्पर्धांचे आयोजन केलं होतं. 80 हून अधिक मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.


घरी जेवण करण्यासाठी कोणीच नसल्याने मुलेही स्थलांतरित


सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले 1 हजार 594 लोकवस्तीचे कुलाळवाडी गाव. जत हा दुष्काळी तालुका आणि या तालुक्यातील कुलाळवाडी हे गाव या गावातील 90 टक्के कुटूंब ऊसतोड मजूर आहेत. गावातील बहुतांश लोक दसर्‍याच्या मुहुर्तावर उसतोडीसाठी स्थलांतर करतात. यामुळे मुलांचीही कबिल्याबरोबर फरपट ठरलेली असते. यामुळे शाळेतील संख्या रोडावत होती. गावातील जिल्हा परिषदेतील शिक्षक भक्तराज गर्जे यांनी यामागील कारणाचा वेध घेतला असता आई वडिल उसतोडीला गेल्याने घरी जेवण करण्यासाठी कोणीच नसल्याने मुलेही स्थलांतरित होत असल्याने शाळेला दांडी मारतात असे कारण समोर आले. 


स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने "माझी भाकरी"उपक्रम


दसर्‍यापासून कारखान्याचा हंगाम संपेपर्यंत ते गावी परतत नाहीत. या मुलांसाठी वसतीगृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने मुलांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून शाळेला दांडी मारण्याचे प्रकार समोर आले. मुलांसाठी जेवणाची व्यवस्था झाली, तर मुलांची शाळेतील गळती थांबू शकेल असे त्यांच्या लक्षात आले. नेमकी हीच बाब ओळखून कुलाळवाडी येथील जिल्हा परिषदेतील शिक्षक भक्तराज गर्जे सरांनी मुलांच्या पोटाचा प्रश्न आणि त्यांना स्वयंपाकाच्या बाबतीत स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने "माझी भाकरी"उपक्रम सुरू केला.


यासाठी मुलांनाच भाकरी करण्यास प्रोत्साहन दिले गेले. तिसरी ते आठवी पर्यंतच्या मुलासाठी शाळेतच भाकरी तयार करण्याची स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धा वर्षातून स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनापूर्वी आयोजित करून विजेत्यांना बक्षिसही देण्यात येते. शाळेतील अनेक मुलांना भाकरी बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले, ज्यामुळे अनेक मुलं आता उत्तम प्रकारच्या भाकऱ्या स्वतः बनवतात. इतकच नव्हे तर इतर स्वयंपाक देखील आता या मुलांना येऊ लागला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या