अभिनेत्री रेखा कोविड 19 टेस्ट का करत नाही? बीएमसीचे आरोग्य अधिकारी सांगतात...
रेखा ज्या ठिकाणी राहतात त्याच्या बाजूच्या सोसायटीमध्ये चार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक व्यक्त अभिनेता फरहान अख्तरच्या संबंधित आहे, अशी माहिती बीएमसीचे आरोग्य अधिकारी संजय फुंदे यांनी दिली.
मुंबई : वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात अभिनेत्री रेखाचा 'सी स्प्रिंग' बंगला आहे. या बंगल्यावरील एका सुरक्षारक्षकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. असं असतानाही रेखाने आतापर्यंत कोविड 19 टेस्ट केली नाही. मात्र रेखाने कोविड टेस्ट का केली नाही याची माहिती घेण्यासाठी एबीपी न्यूजने बीएमसीचे एच वॉर्डचे आरोग्य अधिकारी संजय फुंदे यांच्याशी बातचित केली आणि अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी रेखाने आरोग्य अधिकाऱ्यांना घरात देखील येऊ दिलं नाही, अशी माहिती समोर आली आहे.
बंगल्यामध्ये येऊन कोविड 19 टेस्ट करण्याचा सल्ला रेखाला देणारे आरोग्य अधिकारी संजय फुंदे सांगतात, सॅनिटायझेशनसाठी बीएमसीची एक टीम रेखा यांच्या बंगल्यावर पोहोचली होती. त्यावेळी अधिकारी म्हणून मी रेखा यांना कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला देण्यासाठी गेलो होतो. मात्र रेखा यांनी मला बंगल्यातही येऊ दिलं नाही. त्यांच्या मॅनेजर फरजाना यांनी दरवाज्याच्या मागणच माझ्याशी चर्चा केली.
अभिनेत्री रेखाचा बंगला बीएमसीकडून सील, बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण
फरजाना यांनी दरवाजाच्या मागणच त्यांचा फोन नंबर दिला आणि रेखा फोनवर बोलू शकतील, असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर बोलल्याचं संजय फुंदे यांनी सांगितलं. फरजाना यांच्या वतीनं सांगण्यात आलं की, जो सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे, तो आणि रेखा हे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आले नाहीत. सुरक्षारक्षक बाहेरच चहा-नाश्ता करत होता. सुरक्षारक्षकांना बंगल्यात येण्याची परवानगी नव्हती. रेखा यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना ताप नाही किंवा इतर कोणत्याही प्रकारचा त्रासही होत नाही. रेखा यांना काही लक्षणं दिसली तर त्या नक्की टेस्ट करतील आणि याबाबत तुम्हाला कळवू.
संजय फुंदे यांनी पुढे सांगितलं की, रेखा ज्या ठिकाणी राहतात त्याच्या बाजूच्या सोसायटीमध्ये चार कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक व्यक्ती अभिनेता फरहान अख्तरचा संबंधित आहे. मात्र फुंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली नाही. रेखाच्या बंगल्यावरील ज्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे, त्याच्यावर वांद्रे येथील बीएमसीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.