Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाल्याचं दिसतंय. त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे. आता प्रशासनाने याची वेळीच दखल घेतली नाही तर मुंबई गोवा हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे रेल्वे ब्रीजच्या जवळ संरक्षक भिंतीचं सुरू असलेल्या रस्त्याचं काम सध्या बंद आहे. डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक दिवसांपासून काम बंद
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गावरील ही परिस्थिती समोर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गावरील संगमेश्वरजवळील संरक्षक भिंतीचं काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याचा फटका आता नुकत्याच झालेल्या पावसात बसल्याचं दिसून आलं. या ठिकाणचा रस्ता आता खचताना दिसत आहे.
ऐन पावसाळ्यात महामार्ग बंद होण्याची भीती
अशीच परिस्थिती कायम राहिली तर या महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खचणाऱ्या रस्त्याला कुठेही पर्यायी मार्ग नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून डिझेलचा तुटवडा असल्याचं सांगितलं जातंय. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा महामार्ग बंद आहे.
येत्या चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच हा भराव अधिक खचत असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. त्यामुळे ऐन पावसाच्या सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रायगडमध्ये पावसाचा जोर
गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाड पोलादपूरकरांना दिलासा मिळाला आहे. आज सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी गोवा मार्गे कोकणात मान्सून दाखल झाला होता. 6 जूनलाच रायगड जिल्ह्यात पावसाने तुरळक हजेरी लावली होती. मात्र थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पावसाने वातावरणातील उष्म्याचे प्रमाण आणखी वाढले होते.
शनिवारी बराच वेळ महाड पोलादपूर तालुक्यात विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. या परीसरात जोरदार पाऊस पडल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे.
ही बातमी वाचा: