मुंबई/पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधारा (Rain) कोसळत आहेत. हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही  (Vidarbha) दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर, आज पुणे (Pune), रायगड, सांगली, बेळगाव, गोंदिया जिल्ह्यासंह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येते. 


पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस  झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान  झालं होतं.


खासदार बैठक घेणार


यंदाच्या पावसाने नागरिकांचं नुकसान होणार नाही आणि रस्ते तुंबणार नाही, याची काळजी घेणार असून यासंदर्भात लवकरच प्रशासनाची बैठक घेणार असल्याचं नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. खासदार होताच पहिल्याच दिवशी पुण्यातील पावसावर मोहोळ यांनी आश्वासन देण्यात आलं आहे. 


गोंदियात पाऊस तुफान झोडपतोय


गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरीक करत होते, काल मृग नक्षत्राच्या प्रारंभातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकडापासून निश्चितच दिलासा मिळाला होता. मात्र, आज दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा बसला, त्यानंतर संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह आलेल्या पावसामुळे वातावरण थंड झाला असून  मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे.


शहादा तालुक्यातही मुसळधार


नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह  झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी गावच्या परिसरातील या वादळी वाऱ्याने मोठा फटका बसला असून याठिकाणच्या केळीच्या बागांना या पावसाचा तडाखा बसला आहे.  या वादळी वाऱ्यासह पावसात या गावच्या परिसरातील अनेक शेतीमधील केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक  केळीच्या बागांमध्ये तोडणीला आलेल्या केळीचा झाडे घडांसहीत कोलमडून पडली आहेत. गावातील झाडांसहीत वीजेच्या खांब देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात उन्मळून पडल्याच चित्र समोर येत आहे. त्यामुळे, परिसरातील वीज पुरवठा देखील प्रभावीत झाल्याचे चित्र आहे. 


सिंधुदुर्गात पावसाची हजेरी


सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असून जिल्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आज यलो तर उद्या, परवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच या दरम्यान समुद्रात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे देखील वाहणार आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देखील मच्छ विभागाने दिला आहे. जिल्हयात कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला बळीराजाने सुरवात केली आहे.   


बेळगावातही मुसळधार


शहरात दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे काही मिनिटातच अनेक भागात रस्त्यावर पाणी आले. गटारी ची साफसफाई केलेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर दोन फूट पाणी साठले होते.स्मार्ट सिटी योजनेची कामे काही ठिकाणी पूर्ण झालेली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले.शाहूनगर भागात तर अनेक घरात पाणी शिरले.घरात पाणी शिरल्याने घरातील गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.शाहूनगर भागात रस्त्यावर दोन फूट पाणी साठले होते.लोकांना घरी जाण्यासाठी रस्त्यावरील पाण्यातून जाण्याची कसरत करावी लागली.शनिवारी बेळगावचा आठवडी बाजार भरला होता पण पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या लोकांची आणि भाजीपाला विक्रेत्यांची आसरा शोधेपर्यंत तारांबळ उडाली.


रायगडच्या महाडमध्ये पावसाची हजेरी


गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाड पोलादपूरकरांना दिलासा मिळाला आहे आज सुध्दा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.दोन दिवसांपूर्वी गोवा मार्गे कोकणात मान्सून दाखल झाला होता. 6 जूनलाच रायगड जिल्ह्यात पावसाने तुरळक हजेरी लावली होती.मात्र थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पावसाने वातावरणातील उष्म्याचे प्रमाण आणखी वाढले होते.आज शनिवारी बराच वेळ महाड पोलादपूर तालुक्यात विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.आज या परीसरात जोरदार पाऊस पडल्याने ग्रामीण भागात शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे.


धाराशिवमध्ये पावसाची प्रतिक्षा


महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून, काही भागात चांगला पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पेरणीसाठीची संपूर्ण मशागत शेतकरी करत असून, आता  शेतकरी वाट पाहतोय तो पावसाच्या सरी बरसण्याची, शेतीच्या मशागतीमध्ये बळीराजा व्यस्त होताना दिसत आहे.