Maharashtra Grampanchayat Election 2022 Result: कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीचे (Grampanchayat Election Results) निकाल लागले. मंगळवारी जाहीर झालेले काही निकाल लक्षवेधी ठरले आहेत. राजकीय नेत्यांनी, सत्ताधारी, विरोधकांच्या कामगिरीवर चर्चा झडत असताना असताना रिफायनरी विरोधकांच्या भूमिकेबाबतही चर्चा होऊ लागली आहे. राजापूर तालुक्यातील (Rajapur Taluka) धाऊलवल्ली या ग्रामपंचायतीवरती रिफायनरी विरोधक पॅनलचा उमेदवार सरपंचपदी निवडून आला आहे. रिफायनरी विरोधकांकडून रश्मी बाणे (Rashmi Bane) या महिला सरपंच विजयी झाल्या आहेत. त्यामुळे मोर्चे, आंदोलनातून रिफायनरीचा विरोध करणाऱ्या संघटनांनी राजकारणात प्रवेश केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 


रिफायनरी विरोधी संघटनेच्या पॅनलकडून रश्मी बाणे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा पराभव केला. या निकालानंतर आता स्थानिक पातळीवरील राजकारणातून देखील रिफायनरीचा विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढवण्याचा निर्णय कोकणातील रिफायनरी विरोधकांनी घेतला होता.


पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीवर नजर


ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर  बारसू, सोलगाव, धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटनेने सूचक ट्वीट केले आहे. आज ग्रामपंचायत काबीज केली आहे. उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती काबीज करणार असल्याचे सांगत आता राजकीय पक्षांना त्याच भाषेत उत्तर मिळणार असल्याचा निर्धार रिफायनरी विरोधी संघटनेने केला आहे. 


 






रिफायनरी विरोधकांची राजकारणात एन्ट्री, उद्देश काय?


सध्या कोकणातले राजकारण रिफायनरीच्या मुद्द्यावरून ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी  हे देखील रिफायनरीचे समर्थन करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, राजकारण्यांची भूमिका पाहता आता आम्ही निवडणुकीच्या मैदानात देखील उतरणार, असा निर्धार रिफायनरी विरोधकांनी यापूर्वीच केला होता. केवळ रस्त्यावरती नाही तर राजकारणात उतरून देखील आमचं म्हणणं लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दाखवणार असा निर्णय विरोधकांनी काही महिन्यांपूर्वी घेतला होता.


आता, या निर्णयानंतर रिफायनरी विरोधकांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवण्यास सुरुवात केली आहे. आता, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक सरपंच देखील निवडून आला आहे. रिफायनरीचा समर्थन करणाऱ्या कोणत्याही नेत्याला गावात फिरू देणार नाही अशी भूमिका देखील यापूर्वीच विरोधकांकडून घेण्यात आली होती. परिणामी शिवसेनेला आपले 'शिव संपर्क अभियान' देखील राबवता आले नाही. अशा साऱ्या घडामोडी घडत असताना आता रिफायनरी विरोधक थेट राजकारणात उतरत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या: