Konkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी कामादरम्यान राजपूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात झालेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. एमआयडीसीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे RM आंदोलकांची भेट घेण्यासाठी येणार आहे. याची माहिती आंदोलन, स्थानिकांनी 'एबीपी माझा'ला दिली. सकाळी दहा वाजता एमआयडीसीचे अधिकारी भेट घेणार आहेत. अधिकारी भेटून, चर्चा करुन प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत माघार न घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. शासन, स्थानिक प्रशासन विश्वासात न घेता रिफायनरी संबंधित काम करत असल्याने नागरिकांचा रोष वाढला आणि त्यांनी ठिय्या मांडला होता.


रिफायनरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राजापूर तालुक्यामधील शिवणे खुर्द गावच्या सड्यावर बुधवारी (8 जून) दुपारी तीन वाजल्यापासून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली होती. गावात माती परीक्षण, ड्रोनमार्फत सर्व्हे केला जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर शिवणे खुर्दच्या सड्यावर येत नागरिकांनी ठिय्या मांडला. जवळपास 600 नागरिक सर्वेक्षण विरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये महिला पुरुष, तरुण वृद्ध यांचा समावेश सुरु होता. 


काल दुपारी तीन वाजता सुरु झालेलं ठिय्या आंदोलन पहाटेपर्यंत सुरु होतं. नागरिकांनी काळ्या कुट्ट अंधारात उघड्या माळरानावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता रिफायनरी विरोधी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. शासन, प्रशासन ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर नागरिकांचा विरोध पाहता प्रशासनाने दखल घेतली. आज सकाळी एमआयडीसीचे अधिकारी आंदोलकांची भेट घेणार आहेत.


सध्या काय काम सुरु आहे? 

कोणताही प्रकल्प आणत असताना त्याला लागणाऱ्या गरजांची चाचपणी केली जाते. जागा, पाणी, वीज, रस्ता याचा विचार करत खर्चाचा आकडा काढला जातो. अर्थात या साऱ्याला कॉस्ट असेसमेंट असे म्हणतात. सध्या रिफायनरीबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी कॉस्ट असेसमेंटचं काम सुरु आहे. शिवाय, ड्रोन सर्वे करत जागेबाबत, झाडांबाबत, घरांबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. इंजिनिअर्स इंडिया लिमिडेट या कंपनीकडून ड्रोन सर्वे आणि माती परीक्षणासारखी कामं केली जाणार असून त्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला जाईल अशी माहिती रिफायनरीशी संबंधित आणि प्राथमिक स्तरावर माहिती असलेल्या व्यक्तीने 'एबीपी माझा'ला दिली आहे. त्यामुळे रिफायनरीचं कामकाज प्रत्यक्षात सुरु नसलं तरी प्रकल्प येण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या बाबींची सध्या चाचपणी केली जात आहे.  

संबंधित बातम्या