रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्याच्या मुद्यावरुन सध्या वातावरण गरमागरमीचं आहे. मोठ्या प्रमाणात विरोध असला तरी समर्थन देखील करणारे आहेत. काहींनी तर आपली जागा रिफायनरीला देण्याची तयारी दर्शवली आहे. रिफायनरीबाबत सध्या कोणताही अध्यादेश निघालेला नाही. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर मात्र शिवसेनेचे काही स्थानिक नेते याबाबत सकारात्मकपणे पुढे येत आहे. दरम्यान, रिफायनरीच्या प्रस्तावित जागेवर सध्या सर्वेक्षण सुरु आहे. काही ठिकाणी माती परीक्षणासाठी ड्रिलिंग केलं जात आहे. तर त्याचवेळी ड्रोन सर्वेक्षण देखील केले जाणार आहे. त्यासाठी या कामाशी निगडीत लोक या भागांमध्ये सध्या वावरत आहेत. आज सकाळी राजापूर तालुक्यातील गोवळ गावच्या सड्यावर अर्थात माळरानावर अशाच प्रकारे काम सुरु होतं. गोवळ गावच्या काही ग्रामस्थांनी ही बाब पाहिली आणि त्यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला. यावर गावकरी न थांबता त्यांनी संबंधितांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडून मिळालेली उत्तरं समाधानकारक नसल्याची माहिती स्थानिकांना 'एबीपी माझा'ला दिली आहे. परिणामी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी काम रोखत त्यांना थेट गावात आणलं. त्यानंतर राजापूर पोलीस ठाण्याला याची कल्पना दिली. त्यामुळे सध्या हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं आहे.
सध्या काय काम सुरु आहे? कोणताही प्रकल्प आणत असताना त्याला लागणाऱ्या गरजांची चाचपणी केली जाते. जागा, पाणी, वीज, रस्ता याचा देखील विचार करत खर्चाचा आकडा काढला जातो. अर्थात या साऱ्याला कॉस्ट असेसमेंट असे म्हणतात. सध्या रिफायनरीबाबत कोणताही निर्णय झालेला नसला तरी कॉस्ट असेसमेंटचे काम सुरु आहे. शिवाय, ड्रोन सर्वे करत जागेबाबत, झाडांबाबत, घरांबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. इंजिनिअर्स इंडिया लिमिडेट या कंपनीकडून ड्रोन सर्वे आणि माती परीक्षणासारखी कामं केली जाणार असून त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती रिफायनरीशी संबंधित आणि प्राथमिक स्तरावर माहिती असलेल्या व्यक्तीने 'एबीपी माझा'ला दिली आहे. त्यामुळे रिफायनरीचं कामकाज प्रत्यक्षात सुरु नसलं तरी प्रकल्प येण्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या बाबींची सध्या चाचपणी केली जात आहे.
परवानगीचं काय?संबंधित कामं केली जात असताना जमीन मालक किंवा शासनाची परवानगी देखील लागते. विरोधकांच्या म्हणण्यानुसार सदरच्या कामासाठी कोणत्याही जमीन मालकाची परवानगी नसल्याचं सांगितलं जात आहे. पण, रिफायनरी समर्थक किंवा रिफायनरीशी संबंधित असलेल्या यंत्रणेकडून मात्र जमीन मालकांच्या परवानगीने काम सुरु असल्याचा दावा केला जात आहे. मुख्य बाब म्हणजे ड्रोन सर्वेक्षणासाठी लागणारी परवानगी आणि त्यासाठी केलेला पत्रव्यवहार देखील माझाने यापूर्वी समोर आणलेला आहे.
विरोधक आक्रमकदरम्यान, सध्याच्या घडामोडीवरुन रिफायनरी विरोधक आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत आम्ही संयमाने, लोकशाहीने सारं काही केलं. पण, आम्हाला अंधारात ठेवत, विरोध असताना देखील कामकाज केलं असेल तर आम्ही गप्प राहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.
संबंधित बातम्या