रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबत आता काहीना काही सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत. शिवसेनेची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. पण, त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक अर्थात राजापूर-लांजा या विधानसभा मतदारसंघातील आमदार राजन साळवी यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कोयना धरणातील पाणी रिफायनरी प्रकल्पासाठी वळवावे अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी हे पत्र दिल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी एबीपी माझाकडे बोलताना दिली आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचं आता समोर येत आहे. 


प्रकल्पाला तब्बल 2 ते 2.5 टीमएसी पाणी दरवर्षी लागणार आहे. कोयना धरणामध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर पाणी कोळकेवाडी धरणामध्ये सोडले जाते. त्यानंतर हेच पाणी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या माध्यामातून अरबी समुद्राला येऊन मिळते. जवळपास 67.5 टीमएसी इतके हे पाणी आहे. त्यामुळे सदरचे पाणी रिफायनरीसाठी वापरावे. शिवाय, कोयना धरणातून पाणी आणण्यासाठी 120 किमी पाईपलाईनची गरज असणार आहे. त्यामुळे चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातून ही पाईपलाईन येत असताना त्याचा फायदा हा काही गावांना देखील होणार आहे. परिणामी, पाण्याचं दुर्भिक्ष देखील संपेल असा उल्लेख देखील या पत्रामध्ये केला आहे. 


गाळ उपशाचा देखील मुद्दा
मुख्य बाब म्हणजे अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर राजापूर शहरात दरवर्षी पाणी भरते. नद्यांमधील गाळ हे या ठिकाणचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून गाळ उपसा देखील केला जाऊ शकतो असा उल्लेख या पत्रामध्ये केला गेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले आहे. 


भाजपचा स्वागत मेळावा
शिवसेनेची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. पण, भाजप मात्र उघडपणे प्रकल्पाचे समर्थन करत आहे. येत्या रविवारी अर्थात 29 मे रोजी भाजपने राजापूर येथे रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ स्वागत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यावेळी माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे देखील उपस्थित राहणार आहेत. शिवाय, भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार आणि नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.