Success Story : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी आस्मनी तर कधी सुलतानी संकट येतं. या संकटाचा सामना करत काही शेतकरी आपल्या शेतात यशस्वी प्रयोग (Success Story) करत आहेत. कोकणात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असून काजू आणि आंबा ही कोकणातील प्रमुख पिकं... पण या पिकांना फाटा देत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील वासुदेव घाग यांनी बांबूच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.  जवळपास पाच वर्षांपूर्वी केलेली सुरुवात आज घाग यांना वर्षाकाठी लाखोंची कमाई करून देत आहे. 


 सैन्यात ट्रेनर म्हणून कामाला असलेले रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील वासुदेव घाग यांना निवृत्तीनंतर आपल्या मूळगावी शेती करायची होती. त्यामुळे त्यांनी सारासार विचार करून, संपूर्ण माहिती घेत आंबा आणि काजू या पिकांना बगल देऊन आपल्या मूळ सौंदळ या गावी बांबू शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या सात एकरावरील डोंगराळ भागात त्यांनी बांबूची शेती केली आहे. त्यातून वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल होते.  


पंधरा ते वीस हजार बांबूची तोड


बांबूच्या शेतीचा हा  यशस्वी प्रयोग करण्यामागे वासुदेव घाग यांचा संघर्ष मोठा आहे. कारण, त्यासाठी त्यांना मुंबईतील घर विकावं लागले. 2018 साली घाग यांनी बांबूच्या लागवडीला सुरुवात केली. सध्याच्या घडीला त्यांच्या शेतात 3000 बांबुची बेटे असून त्यातून वर्षाकाठी पंधरा ते वीस हजार बांबूची तोड होते. यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा देखील होतो. 


पारंपारिक शेतीच्या मागे न जाता नियोजनबद्ध शेती


घाग यांनी डोंगराळ भागातील स्मशानाच्या बाजूला असलेली जवळपास दहा एकर जागा तीन लाख रुपये प्रति एकर अशा दराने विकत घेतली. जागा स्मशानाजवळ असल्याने तसंच बांबू लागवड केली जाणार असल्याने सुरुवातीला लोकांनी मला मुर्खात काढल्याचे घाग सांगतात. पण, आज बांबूची लागवड यशस्वी ठरल्यानंतर हेच लोक कौतुक करतात असं देखील ते सांगतात.  मुख्य बाब म्हणजे घाग यांना या कामामुळे त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मुलाची मोठी साथ लाभली.  दरम्यान पारंपारिक शेतीच्या मागे न जाता नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यासपूर्वक केलेला विचार आणि प्रयोग देखील यशस्वी ठरतो हे घाग यांनी दाखवून दिले आहे. 


हे ही वाचा :


Success Story :भंडाऱ्यात बागायती शेतीतून शेतकऱ्यानं साधली आर्थिक प्रगती; कारले, चवळी शेंग,काटवलच्या उत्पन्नातून कमावतोय लाखो रुपये