भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्हा हा भात पीक उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचं उत्पादन घेतले जाते. भात पिकातून पाहिजे त्या प्रमाणात नफा मिळत नसल्यानं आता अनेक शेतकरी नाविन्यपूर्ण शेतीतून आर्थिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. किंबहुना भात उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी आता बागायती शेतकरी बनले आहेत. सुरेश ईश्वरकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश ईश्वरकर यांनी पावणे तीन एकरात बागायती शेती केली असून त्यातून केवळ पाच महिन्यात ते सहा लाखांचं उत्पादन घेतले आहे. 


 भंडारा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मोहाडी तालुक्यातील भोसा टाकळी येथील सुरेश ईश्वरकर यांनी कृषी विभागातील  ठिबक सिंचन, ड्रिप या योजनेतून पाऊण एकरात काटवलची लागवड केली आहे. तर अर्धा एकरमध्ये चवळीच्या शेंगा, अर्धा एकारमध्ये कारली आणि एक एकरात मिरचीचं उत्पादन घेतलं आहे. भंडारा जिल्ह्यात काटवल उत्पादन घेणारे शेतकरी नाहीत. मात्र, ईश्वरकर यांनी एक पाऊल पुढे टाकत पाऊण एकरमध्ये कटवलची लागवड केली. यासाठी त्यांना केवळ 30 हजारांचा खर्च आला आहे. प्रत्येक 6 दिवसानंतर काटवलची तोडणी करतात. सुरुवातीला काटवलला प्रती किलो 200 रुपये दर मिळाला. आता 160 रुपये प्रति किलोनं काटवल विकल्या जात आहे. एका महिन्यात तीनशे किलोची विक्री बाजारात होत आहे. काटवल एकदा लावल्यानंतर पुढील पाच वर्ष त्यातून उत्पन्न मिळते. पुढील चार महिन्यांपर्यंत काटवल निघणार असून त्यातून त्यांना दोन लाखांचा निव्वळ नफा होण्याची अपेक्षा आहे.


ईश्वरकर यांनी अर्धा एकरात कारल्याची शेती केली आहे. त्यासाठी त्यांना 25 हजारांचा खर्च आला असून एक दिवसाआड कारली तोडल्या जातात. दोन महिनेपर्यंत कारली विक्रीसाठी निघणार आहे. यातून त्यांना निव्वळ नफा 50 हजारांच्या घरात राहण्याची अपेक्षा आहे. कारली सोबतच चवळीच्या शेंगासुद्धा अर्धा एकरमध्ये त्यांनी लावल्या आहेत. त्यासाठी त्यांना 25 हजारांचा खर्च आला असून दोन महिन्यात त्यांना निव्वळ नफा 50 हजारांचा मिळणार आहे. तर, एक एकरात त्यांनी मिरचीची बाग पिकवली आहे. चार महिने मिरचीचं उत्पादन निघणार आहे.  त्यासाठी त्यांना तीन लाखांचा खर्च आला असून पुढील चार महिन्यात अडीच टनापेक्षा अधिक मिरची उत्पादन होईल, त्यातून त्यांना 3 लाखांचा नफा होण्याची अपेक्षा आहे.


 काटवल, चवळीच्या शेंगा, कारले या बागायती शेतीतून ते केवळ पाच महिन्यात सहा लाखांचं उत्पादन घेतात. यात त्यांचं अख्खं कुटुंब शेतात काम करते. भाताच्या शेतीतून बागायती शेतीकडे वळल्यानेच ईश्वरकर यांनी आर्थिक प्रगती साधली असून, त्यांचं अनुकरण अन्य शेतकऱ्यांननी केल्यास सर्वांची नक्कीच आर्थिक प्रगती होण्यास मदत मिळणार आहे.


हे ही वाचा :


Success Story : हिंगोली जिल्ह्यात करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग, आठ एकरात 16 लाखांचं उत्पन्न अपेक्षित; कमी खर्चात अधिक नफा