Kashedi Tunnel: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना गणेशोत्सवात दिलासा; कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू होण्याची शक्यता
Kashedi Tunnel: गणेशोत्सवात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कशेडी बोगदा हा गणेशोत्सवापूर्वीच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
Mumbai Goa Highway Kashedi Tunnel: कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा (Kashedi Tunnel) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे.
काँक्रेटीकरणाचे हे काम उल्हासनगरच्या 'जय भारत' या कंपनीने सुरु केले आहे. तयार काँक्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो त्याचा दर्जा ढासळतो त्यामुळे तयार झालेल्या रस्त्याला पावसाचे पाणी लागू नये म्हणून 15 मीटर लांबीचे दोन शेड बनवत काँक्रीटीकरण काम जोरात मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले आहे. या बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्यानंतर कशेडी घाटाचा वळसा घालून कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासातून कोकणात गणपतीला जाणाऱ्या प्रवाशांची सुटका होणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास 45 मिनिटांचा कालावधी लागतो आणि त्यात एखादं अवजड वाहनात बिघाड झाल्यास घाटावरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले.
चार वर्षांची प्रतीक्षा संपणार!
वर्ष 2019 चे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कंपनीने या बोगद्याच्या कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आता बोगद्याचे काम आता पूर्णत्वास गेलेले आहे. या ठिकाणी सार्वजनिक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या बोगद्याची दोन वेळा पाहणी केली. त्यानंतर रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याची पाहणी केली होती.
मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच डिसेंबर 2024 ही शेवटची डेडलाईन चौपदरीकरण पूर्ण करण्याची असून कंपनी ठेकेदार आणि संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वळणवळणाच्या घाटातून प्रवास करण्यापेक्षा या बोगद्यातून चाकरमान्यांचा सुखकर प्रवास कोकणात व्हावा यासाठी या बोगद्यातील रस्त्यावरील काँक्रेटीकरण करण्याचे काम सध्या दिवस रात्र सुरू आहे. दोन दिवसानंतर राज्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या ठिकाणी येऊन त्याची पाहणी करणार आहेत. कशेडी घाटाचा पर्यायी तयार झालेला बोगदा हा गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत दिली होती.