Mahad Assembly Constituency : "तिर कामठा हे आदिवासी लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. त्यांना बाकी काही कळत नाही. परंपरेनुसार ते तिर कामठ्यावर शिक्का मारतात किंवा बटण दाबतात. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं आव्हान देखील असणार आहे. त्यामुळे भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांना मतदारसंघातील स्थिती फार सोपी असेल अशी स्थिती निश्चितच नसणार आहे. आता तिर कामठा म्हटल्यानंतर तुम्हाला ही कोणती निशाणी? असा प्रश्न पडल्यास त्यात गैर काही नाही. कारण, धनुष्यबाणाला आदिवासी लोक तिर कामठा म्हणतात. त्यामुळे सध्याची शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गटात (Shinde Group) सुरु असलेली, दोन्ही बाजूने दावा केली जात असलेली लढाई कुणाच्या बाजूने झुकणार हे देखील आगामी काळात महत्त्वाचं असणार आहे. त्यावर देखील भविष्यातील समीकरणं अवलंबून असणार आहेत," ही प्रतिक्रिया आहे 'रायगडचा आवाज'चे वृत्तसंपादक संजय भुवड यांची. 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


जाणकारांच्या मते, महाडमधील लढत लक्षवेधी आणि अटीतटीची होऊ शकते 
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. पण, रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापची ताकद असताना देखील शिवसेना वाढली नव्हे तिथून त्यांचे तीन आमदार देखील निवडून आले. पण, एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि महाडचे आमदार भरत गोगावले एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सध्या शिवसेनेचे प्रतोद म्हणून देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांची नेमणूक केली आहे. शिवाय, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले तसं पाहायला गेल्यास चर्चेतील नाव. त्यामुळे राजकीय अभ्यासक, जाणकार किंवा पत्रकारांशी बोलत आम्ही महाड विधानसभा मतदारसंघातील स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत केला. त्यावेळी अभ्यासकांनी सांगितलेल्या मतानुसार महाडमधील लढत ही कुणासाठी सोपी यापेक्षा ती लक्षवेधी आणि अटीतटीची होऊ शकते हे मत. कारण, रायगडमधील जातीचं समीकरण, दुर्गम भाग यांचा विचार देखील करणं गरजेचा आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. सध्या हे सर्व आमदार शिवसेनेत आहोत हे सांगत असले तरी शिंदे गटात गेले आहेत. सध्या याबाबत घडत असलेल्या घडामोडी, न्यायालयीन लढाई ही बाब पुढील काळात समीकरणं बदलवू शकते अशी शक्यता जाणकारांशी बोलल्यानंतर नाकारता येत नाही. 


महाडमधील राजकीय गणितं किचकट
रायगड जिल्ह्यातील कर्जत, अलिबाग आणि महाडमधील स्थिती जाणून घेत असताना एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवते. ती म्हणजे कोकणातील रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे इथली गणितं सरळ रेषेत समजूत येत नाहीत. ती काहीशी किचकट अशीच आहेत. सध्याची परिस्थिती पाहिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. शिवाय, भाजप देखील कोकणात सक्षम राजकीय पर्याय उभं करु पाहत आहे. त्याबाबत देखील 'एबीपी माझा'ने 'रायगडचा आवाज'चे संपादक संजय भुवड यांना देखील विचारले. त्यावेळी बोलताना त्यांनी 2004 पासूनची गणितं समजवून सांगितली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भरतशेठ गोगावले यांच्या राजकीय प्रवास देखील सांगितला.


"2004 साली प्रभाकर मोरे यांना शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी आणि दुफळी यामुळे पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर शिवसेनेला भरतशेठ गोगावले यांनी सावरलं. तीन वेळा भरतशेठ गोगावले आमदार झाले ही त्यांची मेहनत आहे. त्यांचा वावर हा सर्वसामान्यांमध्ये दिसून येतो. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. गोगावले यांचा प्रभाव असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार. त्यामुळे भरतशेठ गोगावले यांना भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांना 2019 मध्ये जवळपास 25 हजारांच्या घरात मताधिक्य होतं. पण, ते राखण्यासाठी त्यांना मेहनत ही अटळ आहे. त्यामुळे संघर्ष हा अटळ असणार आहे. महाड विधानसभा मतदारसंघात भरतशेठ गोगावले यांना शेकापचं आव्हान न राहता ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं असणार आहे. काँग्रेसची 75 हजार मतं ठाम असणार आहेत. 2019 मध्ये दिवंगत माणिकराव जगताप यांनी गोगावले यांना आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे यावेळी काँग्रेसचा जो कुणी उमेदवार असेल त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद उभी करु शकते. परिणामी, गोगावले यांना आव्हान असणार आहे हे नक्की. सध्याचं गणित पाहता ही जागा काँग्रेसला जाईल. त्यामुळे भरतशेठ गोगावले यांना काँग्रेसचं आव्हान असेल. भरतशेठ गोगावले यांचा करिष्मा असला तरी बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग देखील आहे. सध्या एकनाथ शिंदे गट आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत असं सांगत आहेत. पण, निवडणुकीत ते हा मुद्दा लोकांपर्यंत, मतदारांपर्यत कसा पोहोचवणार? हे देखील पाहायला लागेल. कारण, या विधानसभा मतदारसंघात असलेल्या आदिवासी मतदारांना केवळ तिर कामठा अर्थात धनुष्यबाण हिच निशाणी माहित आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईनंतर कुणाला काय चिन्हं मिळणार? यानंतर देखील शिवसेना किंवा एकनाथ शिंदे गटातील उमेदवाराची कसोटी असणार आहे," अशी प्रतिक्रिया संजय भुवड यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.
 
आगामी काळात गणितं बदलतील. सद्यस्थितीवर राजकीय अभ्यासकांनी केलेलं हे भाष्य आहे. पण, या सर्वातून एक गोष्ट मात्र नक्कीच स्पष्ट होत आहे की ज्याप्रमाणे चित्र दिसत आहे त्याप्रमाणे ते नक्कीच नाही. परिणामी आता प्रत्येक राजकीय पक्षाची आणि उमेदवाराची कसोटी लागणार आहे. हे नक्की!


संबंधित बातम्या