Rajapur Assembly Constituency : दगडाला शेंदूर फासून त्याला मतदान करा म्हणून शिवसेनेने आवाहन केल्यास त्याला देखील मतं मिळतील आणि विजय मिळेल, असा शिवसेनेसाठी सेफ, हक्काचा आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील बालेकिल्ल्यांपैकी एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे लांजा-राजापूर-साखरपा (Lanja-Rajapur-Sakharpa). या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आमदार आहेत. राजन साळवी एकनाथ शिंदे गटात गेले नाहीत. पण, राज्याच्या बदलत्या राजकारणाचा या ठिकाणी देखील प्रभाव नक्कीच दिसून येईल. सध्या या मतदारसंघात राज्यातील उलथापालथीनंतर पडझड अशी झालीच नाही. पण, त्याचवेळी विद्यमान आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची कामगिरी, तसेच काँग्रेसची साथ या बाबी देखील महत्त्वाच्या ठरणार आहे. आगामी विधानसभा निडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर काँग्रेसची साथ शिवसेनेला कशी मिळेल? यावर देखील या ठिकाणची गणितं अवलंबून असणार आहे. कारण, 2019 च्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांना मिळालेली मतं ही लक्षणीय होती. शिवाय कुणबी समाजाची मतं देखील निर्णायक ठरणार आहेत. त्याचवेळी देशाचं आणि जगाचं लक्ष आणि चर्चेत असलेला तेल शुद्धीकरणाचा कारखाना देखील या मतदारसंघात असल्याने त्यावरुन होत असलेला विरोध, राजापूर (Rajapur)तालुक्यातील पश्चिम भागातील रिफायनरीला विरोध करणाऱ्या गावाने शिवसेनेच्या विरोधात घेतलेली भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे. अर्थात आगामी काळात गणितं बदलू शकतात, रिफायनरीबाबत शिवसेना (Shiv Sena) काय भूमिका घेते हे महत्त्वाचं असेल. पण, असं असताना शिवसेनेसाठी किंवा अगदी विद्यमान आमदार म्हणून राजन साळवींसाठी लढाई सोपी नसणार आहे. राजन साळवींची वैयक्तिक किमान 15 ते 20 हजार मतं असतील अशी चर्चा या मतदारसंघात पाहायला मिळते. पण, इथलं समाजकारण, राजकारणाचा विचार करता त्यावर शिवसेना किंवा राजन साळवी यांनी किती विसंबून राहावं हा प्रश्न आहे. 


राजन साळवी यांच्याबद्दल नाराजीचा सूर
या मतदारसंघाची सध्याची राजकीय स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही पत्रकारांशी, राजकारणाशी निगडीत काही लोकांशी चर्चा केली.त्यावेळी त्यांनी 'राजन साळवी यांनी मागील 15 वर्षात केलेलं काम जे लोकांच्या निदर्शनास येईल असं दाखवा? असा पहिला सवाल केला. कोरोनाचा काळ हे मागील दोन वर्षातील कारण होऊ शकेल. पण, त्यानंतर देखील आमदार म्हणून त्याचं काम दिसून येत नाही. मतदारसंघातील लोकांच्या वैयक्तिक कार्यक्रमांना त्यांची आमदार म्हणून असणारी हजेरी मात्र त्यांच्याकरता जमेची बाब आहे. पण, त्यांच्याकडून ठोस अशी कामं झाली आणि त्याबद्दल लोकांचं समाधान असं दिसून येत नाही. याकडे दुर्लक्ष केलं तरी राजकीय स्थितीचा अंदाज घेताना काँग्रेसला यापूर्वीच्या निवडणुकीत मिळालेली मतं आणि त्यांच्या मागे असलेली लोकं यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्या अविनाश लाड या ठिकाणी काही प्रमाणात का असेनात सक्रिय दिसून येतात. कुणबी समाज हा त्यांच्यामागे चांगल्यारितीने आहे. सध्या शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे. 2024 किंवा आगामी विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यास त्यावर देखील इथलं यश अवलंबून असेल. पण, मतदारसंघात फिरताना राजन साळवी यांच्याबद्दल नाराजीचा सूर जाणवतो. त्यामुळे त्यांना निवडणूक सोपी असेल असं अजिबात म्हणता येणार नाही. उद्या एखादा चांगला उमेदवार दिल्यास चित्र वेगळं दिसलं तर त्याबाबत आश्चर्य वाटायला नको. लांजा किंवा साखरपा या भागात देखील काही वेगळी स्थिती नाही,' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


रिफायनरीवरुन शिवसेनेविरोधात रोष
यानंतर आम्ही मुद्दामहून रिफायनरी प्रकल्पाबाबत देखील काहींना सवाल केले.त्यावेळी त्यांनी प्रकल्प कशारितीने गरजेचा आहे. रोजगार, आर्थिक उलाढाल याचा दाखला देखील दिला. पण, असं असताना विरोधात असलेले साळवी सध्या आक्रमकपणे प्रकल्पाचं समर्थन करत आहेत ही बाब जमेची आहे. पण, राजापूर तालुक्यातील पश्चिम भागातील लोकं प्रकल्पाच्या विरोधात आहे. याठिकाणी जाणं राजन साळवी टाळतात. मुख्य म्हणजे शिवसेनेविरोधात देखील रोष आहे. शिवेसेनेने आम्हाला फसवलं अशी भावना या भागातील लोकांची झाली आहे. या साऱ्यामध्ये या भागात शिवसेनेने आपलं शिवसंपर्क अभियान देखील राबवलं नाही. नाणार परिसरात देखील लोकांमध्ये साळवींमध्ये काहीशी नाराजी आहे. शिवसेनेला मतदान न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रकल्प विरोधी पॅनल उभं करण्याचा या लोकांचा मानस आहे. अर्थात तसं झाल्यास यावेळी लागणारा निकाल काय आहे? याचं महत्त्व असेल. पण, त्याचवेळी महाविकास आघाडीचा प्रयोग, काँग्रेसची साथ, विरोधात असलेला उमेदवार, लांजा, साखपरा भागातून मिळणारी मतं निर्णायक असतील. याचं दुसरं कारण म्हणजे याच मतदारसंघाला लागून असलेल्या रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघ आहे. या ठिकाणचे आमदार उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांचा प्रभाव देखील या भागात आहेत. अर्थात त्यावेळी कोण कुणाला मदत करणार? याकडे देखील पाहायाला हवं. शिवसेनेत असताना उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात वितुष्ट होतं. काही काळानंतर ते दूर झालं. पण, आता मात्र शिंदे आणि ठाकरे गटात हे दोघे आहेत. त्यामुळे कुणाचं प्राबल्य किती? ग्रामीण मतदारांची साथ कुणाला? यावर ही गोष्ट निर्भर असेल' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. 


संबंधित बातम्या