Chiplun Sangmeshwar Constituency : रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. सध्या दापोली आणि रत्नागिरी येथील आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. पण, जिल्ह्यात भगव्याचा झंझावात असताना केवळ चिपळूण हा मतदारसंघ 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. त्या ठिकाणी सध्या शेखर निकम हे आमदार आहेत. मुख्यबाब म्हणजे या मतदारसंघात देखील शिवसेनेचा भगवा फडकत होता. पण, 2019 मध्ये मात्र गणितं बदलली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक या भागात सुरु झाली.
शेखर निकम शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. शिवाय, व्यक्ती म्हणून देखील त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. असं असताना राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे या सर्व ठिकाणची राजकीय समिकरणं बदलतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात देखील बदलाची शक्यता किती आहे? राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होणार का तोटा? याबाबत आम्ही चिपळूणमधील काही पत्रकारांशी जाणकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी दिलेली मतं ही एका अर्थानं आश्चर्यचकित करणारी अशीच आहेत. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शेखर निकम यांना फटका बसणार नाही, असं मत यावेळी सांगितलं जात आहे.
2019 पर्यंत शिवसेनेचे वर्चस्व, त्यानंतर मात्र....
याबाबत आम्ही तरुण भारतचे चिपळूण येथील वरिष्ठ पत्रकार राजू शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी राजू शिंदे यांनी '2005 मध्ये भास्कर जाधव शिवसेनेत होते. पण, राजीनामा देत ते बाहेर पडले आणि अपक्ष उभे राहिले पण पडले. पण, त्यांना मिळालेली मतं मात्र चांगली होती. कारण बंडखोर निवडून येता कामा नये हिच त्यावेळची शिवसेनेची रणनिती होती. 2005 साली झालेल्या शिवसेनेच्या पराभवानंतर स्वतः बाळासाहेबांनी चिपळूणच्या शिवसैनिकांना 'मातोश्री'वर बोलावून भगवा खाली आल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. मात्र, तरीही पुन्हा भगवा फडकवण्याची उमेद देऊन कामाला लागल्यानंतर पाचच वर्षात डिपॉझिट जप्त झालेला सेनेचे उमेदवार विजयी झाले. या साऱ्यानंतर देखील 2019 पर्यंत शिवसेना या ठिकाणी आपलं वर्चस्व कायम ठेवून होती. 2019 मध्ये मात्र शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि शेखर निकम विजयी झाले.
मागील तीन वर्षातील नेमकी परिस्थिती काय?
मागील तीन वर्षाच्या काळात कोकणात निसर्ग, तोक्ते आणि जगाप्रमाणे कोरोनाचं संकट आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना दिलेला निधी हा 320 कोटींच्या घरात होता. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली, आपल्या आमदाराची ताकद कशी वाढेल याकडे लक्ष दिलं. पण, याउलट चित्र हे शिवसेनेचं दिसून आलं. मागील तीन वर्षात शिवसेनेकडून पराभवाचं मंथन किंवा पक्ष वाढीसाठी काय प्रयत्न केले गेले? कोणत्या आधारावर शिवसेना वाढेल? पराभव का झाला? त्याला कारणं काय होती? याबाबत साधी विचारणा देखील झालेली नाही. परिणामी, नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असेल तर त्यात चुक काहीही नाही. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वारंवार दौरे होत असताना शिवसेनेचे नेते मात्र फिरकताना देखील दिसत नव्हते. परिणामी मेळावे, बैठका नाहीत. संपर्क कार्यालाय नसल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य शिवसैनिकांचा स्थानिक नेत्यांशी संपर्क ही तुटलेला आहे. अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
शेखर निकम यांचा चांगला जनसंपर्क
यानंतर आम्ही पत्रकार सतिश कदम यांच्याशी देखील संवाद साधला. त्यावेळी बोलताना कदम यांनी 'सध्याच्या घडीला शेखर निकम यांना आव्हान नाही. निकम यांनी आपला मतदारसंघ चांगला बांधला आहे. घराघरात त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यापेक्षा शेखर निकम ही व्यक्ती म्हणून देखील त्यांच्या पाठिशी लोकं आहेत. 2019 मध्ये शेखर निकम कशा रितीनं विजयी झाले? याची जाहिर कबुली रत्नागिरीचे आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे दिली होती. अर्थात शिवसेनेतून त्यांना अंतर्गतरित्या मदत झाली हे नाकारता येणार नाही. आपल्या विधानानंतर सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. पण, राजकारण कळणाऱ्या व्यक्तिला सामंत यांचं गणित कळलं आहे.
राज्यातील शिवसेना फुटीचा काय परिणाम होणार
सध्या चिपळूणमध्ये शिवसेनेमध्ये गटबाजी आहे. अशा वेळी 2019 मध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर देखील सदानंद चव्हाण सक्रिय दिसून आले नाहीत. शिवाय वरिष्ठ नेतृत्वानं देखील लक्ष दिलं असं नाही. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होत गेली. या मतदारसंघाचा विचार करता निकम यांचा वैयक्तिक करिष्मा आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेत झालेल्या फुटीचा चिपळूण विधानसभा मतदारसंघात फटका बसेल असं म्हणता येणार नाही' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
अर्थात चिपळूणच्या राजकाणाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टींचा जाणकारांच्या म्हणण्यानुसार विचार केल्यास चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ होईल असं वाटत नाही. पण, राजकारण आहे. त्यामुळे हिच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहते का? याकाळात काय घडामोडी घडतात? त्यांच्या देखील निश्चितच परिणाम इथल्या राजकारणावर होईल. पण, त्याचा फायदा - तोटा कुणाला होतो? तो कोण उचलतो हे देखील पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या: