Maharashtra Politics Guhagar Assembly constituency : विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून विरोधकांच्या 12 आमदारांचं केलेलं निलंबन आणि सभागृहात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ते देवेंद्र फडणवीसांना केलेलं लक्ष्य यामुळे भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत आले. मुळात शिवसैनिक, त्यानंतर राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत आलेले भास्कर जाधव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या विधानसभा मतदारसंघाचे सध्या आमदार आहेत.


महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अटकळ होती. पण, तसं काही झालं नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या उदय सामंत यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं. भास्कर जाधव यांची नाराजी काही ठिकाणी दिसून देखील आली. सध्या भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे गटात सामील झालेले नाहीत. पण, असं असलं तरी त्यांच्या मतदारसंघात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा धांडोळा घ्यावा लागेल. त्यासाठी शिवसेनेतील अंतर्गत गोष्टींपासून ते जातीपातीच्या राजकारणाचा देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. गुहागर विधानसभा मतदारसंघात जवळपास 60 टक्के मतदार हा कुणबी समाजाचा आहे. या समाजाचा प्रभाव, भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचं यांची या ठिकाणी ताकद किती आहे? त्याचा काय परिणाम होईल याचा परामर्श घेणं गरजेचं आहे. अर्थात विधानसभा निवडणुकींना अवधी आहे. पण, राजकारणात काधीही काहीही होऊ शकतं. 


याच विषयावर बोलण्यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार सतिश कदम यांच्याशी संपर्क साधला. सतिश कदम यांचा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात देखील त्यांचा वावर चांगलाच आहे. यावेळी बोलताना सतिश कदम यांनी म्हटले की, भास्कर जाधव ज्या मतदारसंघाचं नेतत्व करतात त्या ठिकाणी 60 टक्के मतदार हा कुणबी आहे. अनंत गीते शिवसेनेत मध्यंतरी सक्रीय नव्हते. पण, असं असलं तरी कुणबी मतदारांवर त्याचा प्रभाव आहे. कुणबी समाजाची मतं या ठिकाणी गेम चेंजर नक्कीच ठरू शकतात. त्यासाठी अनंत गीते आणि भास्कर जाधव यांचं राजकीयरित्या एकविचार होणे गरजेचं आहे. सध्या त्या भागात भाजपची ताकद नगण्य आहे. विनय नातू हे नाव समोर येत असलं तरी ते तितके सक्रीय दिसून येत नाही. त्यांच्या वडिलांची पुण्याई आणि नाव ही त्यांची जमेची बाजू आहे. पण, सद्यस्थितीत त्यांचं म्हणावं तसं लक्ष गुहागरच्या विधानसभा मतदारसंघात नाही. भास्कर जाधव यांना आपल्या मुलाकरता देखील प्रयत्न करायचे आहेत. ते स्वत: चिपळूण-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. पण, त्यांना जागा मिळणे आणि शेखर निकम यांचा जनसंपर्क पाहता त्यांना निवडणूक लढवणे किती सोपं असेल याबाबत मात्र शंका आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग होईल कि नाही हा भाग नंतरचा. मात्र, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस देखील या भागात सक्षम दिसून येत नाहीत. पण,  2019 च्या निवडणुकांचा विचार करता, या ठिकाणच्या गणितांचा, राजकीय समीकरणांचा विचार करता भविष्यात गणितं बदलणार नाहीत हे देखील नाकारता येणार नाही. पण, त्यासाठी भास्कर जाधव यांच्यासमोर सक्षम उमेदवार असणं, त्याची आतापासून पायाभरणी करणे देखील गरजेचं आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


याशिवाय आम्ही काही गुहागरमधील विविध जाणत्या, सर्वसामान्य लोकांशी देखील चर्चा केली.  भास्कर जाधव आपला मुलगा विक्रांतला राज्याच्या राजकारणात उतरवू पाहत आहेत. त्यासाठी गुहागर हा विधानसभा मतदारसंघ सुरक्षित ठरू शकतो अशी चर्चा आहे. भास्कर जाधव हे चिपळूणमधून इच्छूक आहेत असं सांगितलं जातं. मात्र,  त्यांच्यासाठी चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघ सोपा नाही. हा मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे आगामी काळात या लोकांपर्यंत पोहोचणे एक आव्हान असेल. शिवाय, चिपळूणमध्ये असलेली शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी देखील आहे. अशी प्रतिक्रिया जाणकरांनी दिली. त्यामुळे एकंदरीत गुहागर विधानसभा मतदारसंघ हा भास्कर जाधव यांच्यासाठी सुरक्षित आहे असं मानत असताना शिंदे गट किंवा भाजप काय भूमिका घेणार? कोण उमेदवार देणार याला देखील महत्त्व असणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Chiplun Sangmeshwar Constituency : पुन्हा घड्याळ की सेनेचा धनुष्य? पाहा चिपळूण-संगमेश्वर मतदाससंघातील राजकीय समीकरणं