एकनाथ शिंदे आणि त्यांना मिळालेली शिवसेनेतील आमदार, खासदारांची साथ, ही गोष्ट राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नक्कीच आहे. कारण, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि अडीच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेलं बंड देशातच चर्चिलं गेलं. अद्याप देखील महाविकास आघाडी असली तरी राज्याच्या राजकारणात गणितं बदलणार हे नक्की! त्याचा नेमका फायदा कुणाला होणार? एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात किती फायदा होणार? त्या ठिकाणची गणितं कशी आणि कशावर अवलंबून असणार याचा धांडोळा घेत असताना रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण, उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उदय सामंत हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांनी म्हाडा अध्यक्षपद, उपनेते, कॅबिनेट मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या जबाबदाऱ्या देखील पेलल्या आहेत. शिवाय, कोकणातील काही प्रमुख नेत्यांच्या यादीत देखील उदय सामंत याचं नाव येतं. या मतदारसंघाचा अभ्यास करत असताना सामंत कुटुंबियांचे मतदारांशी, मतदारसंघातील लोकांशी असलेले वैयक्तिक संबंध हे कायम चर्चिले जातात. पण, असं असलं तरी शिवसेनेच्या ताकदीकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. याबाबत एबीपी माझानं रत्नागिरी शहरातील काही पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्याकडून मतदारसंघातील स्थितीचा आढावा, त्या ठिकाणची सद्यस्थिती जाणून घेतली. 


यादरम्यान बोलनाता 'सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते गोंधळात आहेत. पण, असं असताना उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर नाराज झालेले किंवा बाजुला सारले गेलेले जुने शिवसैनिक सक्रिय होताना दिसत आहेत. शिवसेनेचे मेळावे, काही कार्यक्रम झाले यावेळी ते दिसून आले. त्यामुळे जु्न्या शिवसैनिकांना गृहित धरून चालणार नाही. या मतदारसंघात 40 ते 45 हजार हा मुस्लिम मतदार आहे. तो सध्या संभ्रमावस्थेत आहे. कारण एकनाथ शिंदे गट भाजपसोबत असल्याची त्याला शंका आहे, परिणामी त्यांची मतं या ठिकाणी निर्णायक ठरू शकतील. त्याच वेळी ग्रामीण भागातील मतदार देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. तसं पाहिल्यास शिवसेनेचा पारंपरिक मतदार कुठं गेलाय असं सध्या तरी म्हणता येणार नाही. तो फक्त वाट पाहतोय. कुठं जाऊ याबाबत संभ्रम असलेला मतदार तसा कमी आहे. शिवाय, आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. सामंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना देखील त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवता आलं नव्हतं. यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद यावर शिवसेनेचं वर्चस्व होतं. शिवसेनेनं योग्य रितीनं प्लॅनिंग केल्यास आगामी काळात उदय सामंत यांना सध्या दिसत असणारी स्थिती तितकीशी सोपी राहणार नाही. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा प्रयोग होणार का? भाजपची काही ठराविक मतं कुणाकडे वळणार? याबाबींचा देखील विचार व्हायला हवा. अर्थात विधानसभा निवडणुकीला सध्या दोन वर्षाचा अवधी असला तरी ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.' अशी प्रतिक्रिया दिली. 


त्यानंतर आम्ही दैनिक लोकमतचे रत्नागिरी जिल्ह्याचे उपमुख्यसंपादक मनोज मुळ्ये यांच्याशी देखील बोललो. मुळये यांना 1995 पासूनच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यावेळी त्यांना आम्ही स्थानिक पातळींवरील गणितांशिवाय सामंत यांच्या वैयक्तिक करिष्म्याबाबत विचारले . त्यावेळी बोलताना त्यांनी 'सामंत जरी शिवसेनेत असले तरी त्यांची वैयक्तिक मतं देखील मोठ्या संख्येनं आहेत ही बाब नाकारता येत नाही, किंबहुना त्याकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही. शिवसेनेत आल्यानंतर त्यांचे संबंध सर्वांशी अधिक दृढ होताना दिसून आले. पण, सामंत हे मंत्री किंवा आमदार असले तरी त्यांच्या पाठिशी असलेल्या दोन चेहऱ्यांकडे नजर अंदाज करता येणार नाही. त्यांचे वडिल आण्णा सामंत आणि मोठे बंधू किरण सामंत. त्यांच्या वडिलांचा देखील मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. पण, त्याचवेळी त्यांचे मोठे बंधू देखील हुशार आणि चाणक्ष आहेत. चाणक्य ही उपमा त्यांना लागू होते. लोकांची पारख त्यांना चांगली असल्यानं प्रत्येकाच्या क्षमतांचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा उदय सामंत यांना प्रत्येक निवडणुकीत झाला आहे. शिवाय, उदय सामंत देखील स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. वाचाळपणा किंवा आरोप प्रत्यारोप न करण्याच्या त्यांच्या परिपक्वतेमुळे विरोधी पक्षही त्यांनी जोडून ठेवले आहेत. पण, असं असताना शिवसेनेच्या काही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडे, त्याच्या जनसंपर्कांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.


विनायक राऊत यांनी उदय सामंत यांना गद्दार, उपरे अशा शब्दात लक्ष्य केले आहे. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार असलेल्या अनंत गीते यांनी रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने हे रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे पुढील उमेदवार असतील असे सुतोवाच केले आहे. उदय बने हे जिल्हा परिषदेच्या विविध पाच गणांमधून निवडून आले आहे. जुना आणि दांडगा जनसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. याचवेळी प्रदिप उर्फ बंड्या साळवी,राजेंद्र महाडिक यासारखे नेते देखील शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे जुने शिवसैनिक किती सक्रिय होतात. शिवाय, नवी फळी किती पुढे येऊन शिवसेनेसाठी काम करते यावर देखील या मतदरासंघातील चित्र अवलंबून असणार आहे असा सूर देखील यावेळी काही पत्रकारांचा होता.