Alibag Assembly constituency : रायगड जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास एकूण सात विधानसभा मतदासंघ. यामध्ये उरण, पनवेल, पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार. कर्जत, अलिबाग, महाड या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार तर, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार.शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेचे कर्जत, अलिबाग आणि महाडमधील तिन्ही आमदार शिवसेनेत सहभागी झाले. शिवसेनेनं 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी स्थापन केली. पण, शिवसेनेत बंड झालं आणि सारं चित्र बदलून गेलं. मुख्यबाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. अर्थात हा शिवसेनेला मोठा धक्का आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेवर नेमकी ही वेळ का आली? शिवसेनेचं काय चुकलं? तीन आमदार असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद देणे ही शिवसेनेची रायगड जिल्ह्याचा विचार करता चुक होती का? यानंतर शिवसेनेपुढे काय आव्हानं असणार आहेत? आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काय फायदा होईल? त्या आमदारांसमोर काय आव्हान असेल याचा आढावा घेण्यासाठी आम्ही रायगड जिल्ह्यातील काही पत्रकारांशी, अभ्यासकांशी बोलून परिस्थितीचा आढावा, कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्ही अलिबाग विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय आहे? याबाबत प्रश्न विचारला. कारण अलिबागमधील शिवसेना आमदार महेंद्र दळवी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. 


दरम्यान, 'एबीपी माझा'शी बोलताना 'मुळात शिवसेनेचे तिन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय गेले? याचा विचार करताना त्यांचं मुळकारण पालकमंत्री या पदामध्ये आहे. कारण, शिवसेनेचे तीन आमदार असताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे येईल अशी अपेक्षा होती. शिवसेना आमदारांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्यात चुक असं काहीही म्हणता येणार नाही. पण, केवळ एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद गेलं. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार असलेल्या आदिती तटकरे या पालकमंत्री झाल्या. त्यावरून शिवसेनेत नाराजी वाढली. त्यामुळे या नाराजीचं मुळ पालकमंत्री या पदात आहे हे समजून घेणे गरजेचं आहे. त्यानंतर आदिती तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या तुलनेनं जास्त निधी हा आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे नाराजी वाढत गेली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम होताना दिसत होती. या साऱ्यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांचच नुकसान यामध्ये जास्त होणार आहे. याचं कारण म्हणजे, पालकमंत्री असताना निधी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात पोहोचली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना वाढत गेला. काही प्रमाणात शिवसेनेचे काही स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी देखील त्यांना मदत करू शकतात. यानंतर दुसऱ्या नंबरवर फायदा झाल्यास होणार तो शेतकरी कामगार पक्षाचा. पण, नुकसान किंवा या बंडाचा फटका हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांना बसणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचं वर्चस्व आहे. त्यांचे कार्यकर्ते देखील मजबूत आहेत. पण, महाड विधानसभा मतदारसंघ वगळता अलिबाग आणि कर्जत येथील शिवसेनेचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप असा प्रवास करून आलेले आहेत. त्यामुळे जुना, सच्चा शिवसैनिक किती त्यांच्या पाठिशी राहिल याबाबत शंका असेल.'अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे कि, सध्या अलिबागमध्ये होणारी लढत हि चुरशीची असणार आहे. अर्थात भविष्यातील आघाड्या, युती, भाजपची रणनिती या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. पण, सद्यस्थिती पाहता आगामी काळात समीकरणं बदलली तरी एकंदरीत अलिबागमधील होणारी लढत ही चुरशीची असेल हे नक्की!


संबंधित बातम्या