Khalapur Irshalwadi Landslide : रायगड (Raigad News) परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi) काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला. झोपण्यासाठी रात्री शाळेत गेल्यानं हे तरुण सुदैवानं बचावले, पण त्यांचे कुटुंबिय मात्र बेपत्ता आहेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. 


घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. अद्याप 100 ते 120 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. घटनेत सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी आपला अनुभव सांगितला. इर्शाळवाडीतील 6 तरुण ही शाळेत रात्री साडेदहा ते 11 च्या दरम्यान झोपण्यासाठी गेली होती. दरड कोसळल्याचा आवाज तरुणांना आले आणि ते धावत डोंगराच्या पायथ्याशी आले. मात्र त्यांचे आई-वडील कुटुंबिय मात्र या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपल्या कुटुंबियांच्या काळजीनं तरुण कासावीस झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे तरुण सातत्यानं आपल्या आप्टेष्टांबाबत विचारणा करत आहेत. दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरीदेखील आपल्या नातेवाईकांच्या ख्याली-खुशालीसाठी तरुणांचा आक्रोश सुरूच आहे. आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला वरती जाऊ द्या, अशी विवंचना वारंवार तरुण पोलिसांकडे करत आहेत. 


घटनेची माहिती मिळताच मंत्री घटनास्थळी दाखल 


दुर्घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले होते. अशातच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण घटनेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला असून, मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी दाखल होणार आहेत. पायथ्यापासून इर्शाळवाडी गावापर्यंत जाण्यासाठी तब्बल पाऊण तास लागतो. 


दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांचा आक्रोश 


दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या 25 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 100 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.